घरमहाराष्ट्रपरीक्षेत कॉपी करताना 63 वर्षांच्या महिलेला पकडले

परीक्षेत कॉपी करताना 63 वर्षांच्या महिलेला पकडले

Subscribe

के. जे. सोमय्या महाविद्यालयातील घटना

परीक्षेत कॉपी करताना एका 63 वर्षांच्या महिलेला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना शुक्रवारी घाटकोपरमधील के. जे. सोमय्या महाविद्यालयात घडली. याप्रकरणी वंदना गणेश सरकार या महिलेविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. चौकशीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सोमय्या महाविद्यालयात 4 मार्चपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयातर्फे घेण्यात येणार्‍या बॅचलर ऑफ सोशल वर्कची परीक्षा सुरू झाली आहे. ही परीक्षा दोन सत्रामध्ये आहे. शुक्रवारी दुसर्‍या सत्रात सामाजिक कार्याचा परिचय या विषयाचा पेपर होता. पेपर सुरू असताना अडीच वाजता वंदना सरकार या महिलेकडे पर्यवेक्षिका सिमरन जयप्रकाश मतानी यांना दोन उत्तरपत्रिका सापडल्या. पहिल्या उत्तरपत्रिकेचा क्रमांक 2559716 तर दुसर्‍या उत्तरपत्रिकेचा क्रमांक 2556774 असा होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच सिमरन यांनी याची माहिती उपप्राचार्य सत्यवान सुधाकरराव हाणेगावे यांना दिली. त्यांनी वर्गात जाऊन पाहणी केली असता त्यातील एक उत्तरपत्रिका कोरी असल्याचे तर दुसर्‍या उत्तरपत्रिकेवर आधीच लिहिलेली उत्तरे आढळली.

- Advertisement -

याबाबत वंदना सरकारकडे त्यांनी चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याची माहिती टिळकनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी सरकारला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिने 24 मार्चला झलेल्या परीक्षेच्या वेळेस एक अतिरिक्त कोरी मुख्य उत्तरपत्रिका घेतल्याचे सांगितले. त्यानंतर उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहून परीक्षेच्या वेळेस तिथे आणली होती. चौकशीनंतर या महिलेला सोडून देण्यात आले. लवकरच तिच्यावर नोटीस देऊन अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -