Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज ठाकरेंना हायकोर्टाचा दिलासा; दोषमुक्तीच्या अर्जावर नव्याने सुनावणी

राज ठाकरेंना हायकोर्टाचा दिलासा; दोषमुक्तीच्या अर्जावर नव्याने सुनावणी

Subscribe

 

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना दोषमुक्त न करण्याचे इस्लामपूर सत्र न्यायालयाचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केले. इस्लामपूर न्यायालयाने राज ठाकरे यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर नव्याने सुनावणी घ्यावी, असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

- Advertisement -

रेल्वे नोकर भरतीत महाराष्ट्रातील तरुणांना प्राधान्य द्यावे यासाठी मनसेने  २००८ साली आंदोलन केले होते. सांगली येथेही हे आंदोलन झाले होते. या आंदोलनाचा सांगलीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरे यांना अटकही करण्यात आली. बेकायदेशीर जमाव एकत्र करणे आणि शांततेचा भंग करणे यासह इतर गुन्हे राज ठाकरे यांच्या विरोधात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची आरोप निश्चिती होत असताना राज ठाकरे यांनी याप्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी सन २०१३ मध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला. महानगर दंडाधिकारी न्यायालयाने राज ठाकरे यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला. राज ठाकरे यांनी आरोप निश्चितीसाठी न्यायालयात हजर रहावे असे आदेश न्यायालयाने दिले. मात्र राज ठाकरे न्यायालयात हजर झाले नाहीत.

महानगर दंडाधिकारी न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्याच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाला राज ठाकरे यांनी इस्लामपूर सत्र न्यायालयात आव्हान दिले. इस्लामपूर न्यायालयाने महानगर दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश कायम ठेवत राज ठाकरे यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. इस्लामपूर सत्र न्यायालयाने आरोपपत्रातील अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले आहे. सत्र न्यायालयासमोर अनेक पुरावे सादर करण्यात आले. ते पुरावेही सत्र न्यायालयाने ग्राह्य धरले नाहीत. त्यामुळे दोषमुक्ती नाकारणारा इस्लामपूर सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करावा, अशी मागणी राज ठाकरे यांच्यावतीने वरीष्ठ वकील राजेंद्र शिरोडकर यांनी न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर केली. या मागणीला राज्य शासनाने विरोध केला. साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर दोषमुक्त केले जाते, असा युक्तिवाद राज्य शासनाने केला.

- Advertisement -

उभयंतांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने राज ठाकरे यांना दोषमुक्ती नाकारणारे इस्लामपूर न्यायालयाचे आदेश रद्द केले. राज ठाकेर यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर नव्याने सुनावणी घ्यावी, असे निर्देश न्या. बोरकर यांनी दिले.

- Advertisment -