मराठीच कार्यक्रम प्रसारित करा, राज ठाकरेंचे सह्याद्री वाहिनीला पत्र

Raj Thackeray

मनसेने आता आपला मोर्चा सह्याद्री मराठी वाहिनीकडे वळवला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दूरदर्शन पश्चिमचे अप्पर महासंचालक नितीन अग्रवाल यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मराठी भाषेतील कार्यक्रमासंबंधित मगणी केली आहे.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा- मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. राज ठाकरेंचे हे पत्र पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी आज दूरदर्शनचे अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांची प्रसारण भवनात भेट घेऊन दिले.

पत्रात काय आहे –

या पत्रात कोशिश से कामयाबी तक, तराने पुराने हे हिंदी कार्यक्रम मराठी सह्याद्री वाहिनीवर दाखवले जातात आणि ते पुन:प्रसारीतही केले जात आहेत. त्याचप्रमाणे सह्याद्री वाहिनीवरली मुलाखत किंवा संवादात्मक कार्यक्रमांमध्येही काही वेळा हिंदी वक्ते किंवा हिंदी भाषेतून संवाद साधणाऱ्या व्यक्तींना निमत्रित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे निश्चितच मूळ उद्देशाला धरुन नाही, असे पत्रात म्हंटले आहे. पत्रात पुढे यशोगाथा असो, सिनेमा गीते असो, पाककृती असो वा इतर कोणताही कार्यक्रम; मराठी भाषेत संवाद साधणारे असंख्य उद्योजक, कलावंत, साहित्यिक, अभिनेते आणि अगदी बल्लवाचार्यही महाराष्ट्रात राज्यात आहेत. त्यामुळे मराठी भाषेत कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी त्यांची कमतरता नाही. याची सह्याद्री वाहिनीसाठी कार्यक्रमांची निर्मिती आणि संबंधित नियोजन करणाऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, असेही पत्रात म्हंटले आहे. पत्रात पुढे आमच्या मागणीचा आपण जरूर विचार करावा आणि योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती पावले उचलेल. असा इशारा देण्यात आला आहे.