घरमहाराष्ट्रपुण्याच्या रांका ज्वेलर्सचे दागिने चोरणारे अटकेत

पुण्याच्या रांका ज्वेलर्सचे दागिने चोरणारे अटकेत

Subscribe

पुण्याच्या रांका ज्वलर्सचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले होते. शनिवारी पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ही घटना घडली होती. रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यानेच या चोरीचा कट रचला होता हे तपासात उघड झाले. याप्रकरणी चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर रांका ज्वेलर्सच्या तब्बल दीड कोटी रुपयांच्या दागिन्यांची लूट झाली होती. या आरोपींना पकडण्यात पुण्याच्या बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला आहे. रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यानेच हा चोरीचा बनाव रचला होता.

अशी घडली होती घटना

मुंबईतील काळबादेवी येथील झवेरी बाजारात असणाऱ्या रांका ज्वेलर्समध्ये काम करणारा कामगार अजय होगाडे हा दागिने घेऊन मुंबईहून पुण्याला जात होता. मात्र पुण्याला पोहोचल्यानंतर फलाट क्रमांक सहाच्या जवळील रिक्षा स्टँडवर आल्यावर त्या ठिकाणी चार अनोळखी व्यक्तींनी त्याच्यावर चाकूने वार करत मारहाण केली. त्याच्या हातातील दागिन्यांची बॅग घेऊन हे चोरटे पसार झाले होते. तब्बल दीड कोटी रुपयांचे हिरे आणि दागिने चोरट्यांनी लंपास केले होते, अशी तक्रार अजय होगाडे याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात केली होती. त्याच्या सांगण्यावरुन पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती.

- Advertisement -

कुटुबियांच्या मदतीने केली चोरी

अजय होगाडे हा काळबादेवीच्या रांका ज्वेलर्समध्ये ऑफिसबॉयचे काम करायचा. याप्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना अजय होगाडे याच्यावरच संशय आल्याने त्यांनी त्याची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याने चोरीचा बनाव रचल्याचे कबूल केले. कर्जबाजारी झाल्याने कुटुबियांसोबत हा सर्व बनाव रचल्याचे त्याने सांगितले. अजय होगाडे याच्या कुटुंबियांवर १२ लाखांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी अजयने त्याचे वडील मारूती होगाडे, भाऊ शरद होगाडे आणि मित्र अन्नू कुमार यांच्या मदतीने चोरी केली.

चोरलेले दागिने रायगडमध्ये लपवले

आरोपी अजय याने शनिवारी सकाळी जेव्हा चोरीची घटना घडली तेव्हा स्वत:च्या अंगावर चाकूने वार करुन घेतले होते. हातात असलेली दागिन्यांची बॅग त्याने त्याचे वडील, भाऊ आणि मित्राच्या हातात देऊन त्यांना मुंबईला जाण्यास सांगितले. ही दागिन्यांची बॅग अजयचे वडील आणि भाऊ रायगडला घेऊन गेले. ते एका डब्यामध्ये ठेवून टकमक टोकाच्या खाली डोंगराच्या पायथ्याला जमिनीमध्ये पुरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ते घटनास्थळी धाव घेत सर्व दागिने जप्त केले. दरम्यान अजयसह त्याचे वडील, भाऊ आणि मित्राविरोधात बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करत सर्वांना अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -