घरमहाराष्ट्रRaut On Bhujbal : "भुजबळांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार...", संजय राऊतांची मुख्यमंत्री आणि फडणवीसांवर टीका

Raut On Bhujbal : “भुजबळांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार…”, संजय राऊतांची मुख्यमंत्री आणि फडणवीसांवर टीका

Subscribe

महाराष्ट्रात इतक्या टोकाचा जातीय वाद निर्माण करण्याची गरज नाही. महाराष्ट्र ज्या पद्धतीने जातीय वादखाईत ढकलला जातोय, हे राज्याच्या भविष्यासाठी चांगले नाही, अशी खंत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : राज्य सरकारने मराठ्यांसाठी काढलेल्या जीआरविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी भूमिका घेतली आहे. छगन भुजबळांचे राजीनामानाट्य सुरू आहे. भुजबळांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदेंना आहे की, देवेंद्र फडणवीसांना आहे. हे आधी स्पष्ट करावे लागेल, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 16 नोव्हेंबरला मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे, असा गौप्यस्फोट स्वत: छगन भुजबळांनी नगर येथील ओबीसींच्या एल्गार परिषदेत केला आहे.

छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले, “छगन भुजबळांनी घेतलेल्या भूमिका सरळसरळ मुख्यमंत्री आणि सरकारविरोधात आहेत. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एखादा मंत्री भूमिका घेतो, त्यावेळी त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बरखास्त केले जाते, ही परंपरा आहे. पण भुजबळ म्हणतात की, मी राजीनामा दिला आहे. पण माझा राजीनामा स्वीकारला नाही. भुजबळांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदेंना आहे की, देवेंद्र फडणवीसांना आहे. हे आधी स्पष्ट करावे लागेल. महाराष्ट्रातील राजकारण हे लोकांना कळाले आहे की, काय सुरू आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता, उत्तरेत थंडीचा जोर वाढणार

कोणाच्या ताटातले काढून दुसऱ्यांना मिळू नये; शिवसेनेची भूमिका

मी 16 नोव्हेंबरचा राजीनामा दिला आहे. पण सरकारने माझा राजीनामा मंजूर केला नाही. मी ओबीसींच्या मुद्द्यावर ठाम आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. संजय राऊत म्हणाले, “राजीनामा दिल्यानंतरही छगन भुजबळ कॅबिनेट बैठकीत सामील झाले आहेत. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाच्या भूमिका मांडत आहेत. कोणाच्या ताटातले काढून दुसऱ्यांना मिळू नये, ही शिवसेनेची भूमिका आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य व्हाव्यात. धनगर समाज मागणी मान्य व्हावी. ओबीसींच्या ताटातले कोणाला ओरबडून देऊ नये, ही आमची भूमिका आहे. भुजबळांनी देखील हीच भूमिका मांडली आहे. त्यासाठी महाराष्ट्रात इतक्या टोकाचा जातीय वाद निर्माण करण्याची गरज नाही. महाराष्ट्र ज्या पद्धतीने जातीय वादखाईत ढकलला जातोय, हे राज्याच्या भविष्यासाठी चांगले नाही.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -