घरमहाराष्ट्रपीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध

पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध

Subscribe

सर्व व्यवहार बंद, महिन्याला केवळ १००० रुपये काढता येणार

चिंता, आक्रोश आणि काळजी ,पीएमसी बँकेवरील आर्थिक निर्बंधामुळे खातेधारक हैराण

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक निर्बंध लादल्याचे संदेश खातेधारकांना येताच मंगळवारी सकाळी पीएमसी बँकेवर नागरिकांनी एकच गर्दी केली. आमचे पैसे बुडाले का? आमचे पैसे परत मिळणार का? आमच्या मुदत ठेवींचे काय, आमच्या कर्जफेडीचे पैसे कसे भरायचे, बँकेत पडणारा आमचा पगार कसा काढायचा असे अनेक प्रश्न खातेधारकांकडून विचारण्यात येत होते. शाळेत परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी, डॉक्टरच्या खर्चासाठी, सणाच्या खरेदीसाठी पैसे हवे असल्याचे खातेधारकांकडून बँक कर्मचार्‍यांना सांगण्यात येत होते. परंतु बँकेकडून पैसे देण्यास थेट नकार देण्यात आल्याने व समाधानकारक उत्तर न मिळाल्याने खातेधारकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे पीएमसी बँकेमध्ये मंगळवारी सकाळी खातेधारकांमध्ये चिंता, आक्रोश, काळजी व हतबलता दिसून येत होती.

मी मोलमजुरी करून घर चालवतो. मुलांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी काही पैसे वाचवून मी दर महिन्याला बँकेत भरत आहे. परंतु सोमवारी रात्री मला बँकेकडून संदेश आल्यावर मी उडालोच. मी मंगळवारी सकाळी तातडीने कामधंदा सोडून बँकेकडे धाव घेतली. मला माझ्या मुलाच्या परीक्षेचे शुल्क भरायचे आहे. त्यासाठी पैसे हवे आहेत. परंतु आता बँक पैसे द्यायला नकार देत आहे. तसेच सहा महिन्यांनी पैसे मिळतील असे सांगत आहे. परंतु ते पैसेही निश्चित स्वरुपात मिळतील की नाही याची शाश्वती बँकेकडून देण्यात येत नाही. आम्ही मोलमजुरी करून कमवलेले पैसे बँकेने बुडवले असून, आमच्या पैशाबद्दल विचारायला आलो तर बँकेतील कर्मचारी बँकेतून बाहेर काढत आहेत. तसेच कोणतीही माहिती व्यवस्थित देत नसल्याचे सांगत बँकेचे खातेधारक प्रकाश प्रजापती यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. तसेच आता मुलांच्या परीक्षेचे शुल्क कसे भरायचे व आमचे पैसे परत मिळणार का? अशी काळजीही त्यांनी व्यक्त केली.

सर्वसाधारण व्यक्ती बँकेत कर्जासाठी आल्यावर त्यांना 20 वेळा फेर्‍या मारायला लावतात. पण कोणी उद्योजक व नेता आल्यास त्याला तातडीने कोट्यवधींचे कर्ज दिले जाते. त्यांनी कर्ज बुडवले तर त्यांना पकडा आम्हाला का त्रास देत आहात असा प्रश्न विचारत खातेधारक जयंत कंक यांनी संताप व्यक्त केला. मंगळवारी सकाळी बॅकेवर आर्थिक निर्बंध लादल्याचा संदेश मला मिळाला. त्यामुळे मी तातडीने बँकेत आली. तर येथे सहा महिन्यांमध्ये फक्त हजार रुपयेच काढता येणार असल्याचे बँकेतील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. हजार रुपयांमध्ये सहा महिने कसे काढायचे असा प्रश्न विचारत ऐश्वर्या दाभोळकर हिने सध्या सण सुरू असल्याने पैशांअभावी खरेदी कशी करायची, बँकेचे कर्ज, शाळांचे शुल्क कसे भरायचे असा प्रश्न निर्माण झाल्याचे ‘आपलं महानगर’ला सांगत रागाला वाट करून दिली. पैशांबाबत लोकांकडून बँकेच्या अधिकार्‍यांकडे विचारणा करण्यात येत आहे, परंतु त्यांच्याकडून काहीही उत्तर दिले जात नसल्याचेही तिने सांगितले.

- Advertisement -

माझ्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली असल्याने मला काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी पैसे हवे आहेत. म्हणून मी सकाळी 9.30 वाजता बँकेत आलो. तर इथे प्रचंड गर्दी होती. चौकशी केली असता बँक बुडीत गेली असून, आपले पैसे बुडाल्याचे मला काही लोकांकडून सांगण्यात आले. हे ऐकून मला पुन्हा हृदयविकाराचा झटका येतोय की काय असे वाटू लागले. मला पैसे मिळाले नाही तर चाचण्या करता येणार नाहीत, त्यामुळे मला पैसे द्यावेत अशी विनंती मी बँक अधिकार्‍यांना केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत उद्या येऊन हजार रुपये घ्या असे बँक अधिकार्‍यांनी सांगितले. फक्त हजार रुपयांमध्ये मी चाचण्या कशा करणार असा प्रश्न खातेधारक रवींद्र साळवे यांनी केला. आजारी माणसांना त्यांचे पैसे मिळालेच पाहिजेत असेही त्यांनी ठासून सांगितले.

पीएमसी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 23 सप्टेंबरपासून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादल्याने बँकेला नवी कर्ज देणे, कर्जाचे नुतनीकरण, ठेवी स्वीकारणे, दैनंदिन कारभारावरासह अनेक गोष्टींवर निर्बंध घातले. यामध्येच खातेधारकांना सहा महिन्यात केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढता येणार आहे. बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्याचे संदेश बँकेकडून खातेधारकांना गेल्यावर मंगळवारी सकाळी सर्वच खातेधारकांनी बँकेच्या प्रत्येक शाखेवर धाव घेतली.

- Advertisement -

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय)निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. पीएमसी बँक डबघाईला आल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे. बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टमधील नियम 35 अ अंतर्गत बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला असून खातेदार महिन्याला केवळ १००० रुपयेच काढू शकतो. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून पीएमसी बँकेच्या राज्यभरातील शाखांमध्ये सर्व व्यवहार ठप्प झालेत. तसेच बँकेचे ऑनलाईन व्यवहारही बंद आहेत.

दरम्यान, हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. आरबीआयने पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचे सर्व व्यवहार सहा महिन्यांसाठी थांबवले असल्याचे मंगळवारी सकाळी बँकेमार्फत ग्राहकांना सांगण्यात आले. त्यामुळे चिंतीत झालेले ग्राहक बँकेत मोठ्या संख्येने जमले असून, त्यांचे कर्मचार्‍यांसोबत वाद सुरू आहेत. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार पीएमसी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नवे कर्ज देता येणार नाही. तसेच ठेवी स्वीकारता येणार नाही. तसेच पुढच्या काळात बँकेला गुंतवणूक करता येणार नाही. त्याबरोबरच बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यामधून केवळ एक हजार रुपये एवढीच रक्कम काढता येईल.

निर्बंधांच्या काळात बँकेला कर्मचार्‍यांचे पगार, दैनंदिन खर्च, शाखांच्या जागांचे भाडे यासाठी रक्कम खर्च करता येईल. कायदेशीर खर्चासाठीही ठरावीक मर्यादेपर्यंतच रक्कम खर्च करता येईल. दरम्यान, हे निर्बंध सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असून, त्यानंतर रिझर्व्ह बँक पीएमसी बँकेबाबत पुढील निर्णय घेईल.

यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी पीएमसी बँकेचे संचालक जॉय थॉमस यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर काही निर्बंध घातले आहेत. बँकेच्या व्यवहारात अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पुढील सहा महिन्यांच्या आत अनियमिततेमधील या त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पुढील सहा महिन्यांत या त्रुटी दूर करून बँक संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच या काळात ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबाबत दिलगिरी व्यक्त करून बँकेला सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली आहे.

खातेदारांसाठी गाइडलाईन
पुढील सहा महिने खातेधारकांना त्यांच्या एका खात्यातून महिन्याला फक्त 1 हजार रुपयेच काढता येणार.
खात्यात कितीही रक्कम असली तरी महिन्यातून हजार रुपयेच मिळणार.
या काळात बँकेतून मुदत ठेवी काढता येणार नाहीत.
पीएमसी बँकेचे कर्ज घेतले असेल तर हप्त्याची रक्कम थेट खात्यात वळती होईल.
कर्ज फेडण्यासाठी कर्जदार त्यांच्या ठेवींचा वापर करू शकतील.

बँकेवर कोणकोणते निर्बंध?
रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देता येणार नाही.
जुन्या कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही.
बँकेला या काळात कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही.
नव्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत
बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करता येणार नाही.
बँकेला कर्मचार्‍यांचे पगार, जागेचे भाडे, कर, विज बिल, प्रिंटिंग, स्टेशनरी, कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येईल.
रिझर्व्ह बँकेने जे निर्बंध घातले आहेत, त्याची माहिती प्रत्येक ठेवीदाराला देणे बँकेला बंधनकारक.

काय आहे बँक रेग्युलेशन अ‍ॅक्टमधील नियम ३५-ए
बँकेचे ठेवीदार, खातेधारक, बँकेकडून कर्ज घेणारे यांचे हित जपण्यासाठी रिर्झव्ह बँक ऑफ इंडिया नियम ३५-ए या नियमाचा वापर करते. एखादी बँक अवसायनात निघण्याची शक्यता लक्षात येताच रिर्झव्ह बँक त्या बँकेला आपल्या आदेशात ठेवते. बँकेला स्वत:चे कोणतेही निर्णय घेता येत नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसारच सदर बँकेला आपले काम करावे लागते. त्यासाठी जास्तीतजास्त सहा महिन्यांचा कालावधीसाठी बँकेवर निर्बंध घालण्यात येतात. त्यानंतर बँकेच्या स्थिती लक्षात घेऊन त्याचे विलीनीकरण अथवा अन्य पर्यांयांचा मार्ग रिझर्व्ह बँकेला अवलंबवावा लागतो.

रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेला केवळ एक हजार रूपये काढता येणार आहेत, असे निर्बंध घातले आहेत. मी रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांशी चर्चा करत आहे. छोट्या गुंतवणूकदारांचे संरक्षण कसे करता येईल याविषयी आम्ही प्रयत्नात आहोत.
– किरीट सोमय्या, ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट

पीएमसी बँकेवर कलम ३५ ए अंतर्गत येत्या ६ महिन्यांसाठी आर्थिक बंधनं टाकण्यात आली आहेत. बँकेच्या आर्थिक अनियमिततेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल आम्हाला खेद आहे. बँकेचा एमडी म्हणून मी या सगळ्याची जबाबदारी घेतो आणि सर्व ठेवीदारांना हमी देतो की ६ महिन्यांच्या मुदतीपूर्वी ही स्थिती सुधारेल. ही बंधनं काढली जावीत यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. कृपया सहकार्य करावे. – जॉय थॉमस, एमडी, पीएमसी बँक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -