CoronaVirus : मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २८० कोटी रुपये जमा

पीएम केअर निधीसाठी केंद्राने सीएसआरमध्ये सवलत जाहीर केल्यानंतरही मुख्यमंत्री निधीमध्ये मोठ्या प्रमाणात मदत जमा झाली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत २८० कोटी रूपये जमा झाले आहेत. एकीकडे पीएम केअर निधीसाठी केंद्राने सीएसआरमध्ये सवलत जाहीर केल्यानंतरही मुख्यमंत्री निधीमध्ये मोठ्या प्रमाणात मदत जमा झाली आहे. त्यामध्ये छोट्या मुलांच्या खाऊच्या पैशांपासून ते वस्तू, धान्य अशा प्रकारच्या मदतीच्या रकमेचाही समावेश आहे.

आयटीसी प्रा. लि. कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आज २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ते ही शासनासमवेत सहभागी झाले आहेत. या युद्धात त्यांनी आर्थिक मदतीशिवाय अन्नधान्य वितरण, स्वच्छताविषयक साधनांची तसेच गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था यासारख्या कामात देखील पुढाकार घेतला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी देणाऱ्या मोठ्या देणगीदारांमध्ये श्री साईबाबा संस्थान शिर्डी, केएमबीएल सेंटर पेएम, एसबी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, ब्राईट स्टार, एटॉस सिंटेल, जीव्हीके एअरपोर्ट फाऊंडेशन, फोर्स मोटर लिमिटेड, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, बी जी शिर्के कंस्ट्रक्शन टेक, एशियन पेंट्स, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मॅनकाइंड फार्मा लिमिटेड, टिफनी फुड्स, टोरंट पॉवर लिमिटेड, माइंडस्पेस बिझनेस पार्क लिमिटेड, टोरंट फार्मा, शाहरूख खान, मेघा इंजिनिअरींग आणि आयसीटी ट्रस्ट यांचा समावेश आहे.

समाजाप्रतीच्या दायित्व भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करणाऱ्या दात्यांचे मदतीचे हात अनमोल आहेत. या संकटकाळात बालकांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. ही मदत फक्त पैशात सांगता किंवा मोजता येत नाही. कुणी अडकलेल्या नागरिकांना जेवण देत आहे. कुणी रुग्णालयातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मदत करत आहे, कुणी वस्तु रुपाने तर कुणी अन्नधान्याच्या स्वरुपात मदत करत आहे.  समाजाप्रतीच्या दायित्व भावनेतून केलेल्या या मदतीला कृतज्ञतेचे कोंदण आहे म्हणून त्यांचे हे दातृत्व विलक्षण शोभून दिसत आहे.

या सगळ्यांच्या मदतीसाठी आणि लाखमोलाच्या साथीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने सर्व जनतेचे आभार मानले आहेत. त्यांच्या मदतीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. यापुढे ही अशाच सहकार्याची आणि मदतीची अपेक्षा व्यक्त करतांना आपण सर्वजण मिळून कोरोनाविरुद्धचे हे युद्ध नक्की जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.