घरमहाराष्ट्रनिसर्गाला मारून विकासाची वीट रचता येत नाही; सेनेचा भाजपवर निशाणा

निसर्गाला मारून विकासाची वीट रचता येत नाही; सेनेचा भाजपवर निशाणा

Subscribe

आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवल्यानंतर विरोधी पक्ष भाजपने सरकारवर टीका केली आहे. केवळ अहंकारातून घेतलेला हा निर्णय आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. याला शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्राच्या अग्रलेखातून उत्तर दिलं आहे. शिवाय, निसर्गाला मारून विकासाची वीट रचता येत नाही, असा निशाणा साधला आहे.

आरेतील ‘कारशेड’ कांजूरमार्गला हलवल्यानंतर भाजपकडून टीका सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय दुर्दैवी आहे. केवळ अहंकारातून घेतलेला हा निर्णय आहे’, असं म्हटलं. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. पर्यावरणप्रेमींनी आरेचे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन केले. कापलेल्या झाडांवर डोके टेकून अश्रू ढाळले. हा अहंकार होता काय? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

- Advertisement -

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले, ‘आरे’चे जंगल तसेच राहील. मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभी राहील. पर्यावरणप्रेमींना सुखावणारा हा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या निर्णयाचे प्रचंड कौतुक सध्या होत आहे. मुंबईसारख्या शहराला प्राणवायू पुरवणारे आरेचे जंगल हे सव्वा कोटी लोकसंख्येचे फुफ्फुस आहे. या फुफ्फुसावर हल्ला केला असता तर मुंबईचा श्वास गुदमरला असता. जंगले, झाडे, नद्या, समुद्र, आदिवासी वाचवायला हवेत असे नुसते बोलून भागत नाही. निसर्ग मारून विकासाची वीट रचता येणार नाही,” असं शिवसेनेने म्हटलं आहे. “विदर्भातील विकासातला सगळय़ात मोठा अडसर म्हणजे तेथील झुडपी जंगले. त्या झुडपी जंगलांबाबत निर्णय न घेणारे आरेतील जंगलतोडीसाठी एका रात्रीत निर्णय घेतात. दोन हजारांवर झाडे कापली जातात. त्या झाडांवरील पक्ष्यांची घरटी, त्यांची पिले तडफडून मारली जातात व या अमानुषतेविरुद्ध आवाज उठवणाऱयांना अटक केली जाते. हे प्रकार जंगलराजला लाजवणारेच होते.”

“पर्यावरणप्रेमींनी आरेचे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन केले. कापलेल्या झाडांवर डोके टेकून अश्रू ढाळले. हा अहंकार होता काय? फडणवीस सरकारने अहंकार बाजूला ठेवून पर्यावरणप्रेमींचा मान राखला असता आणि जंगलातील कारशेड कांजूरला आधीच नेली असती तर काय बिघडले असते? पण त्या वेळीसुद्धा अहंकार आडवा आला. विरोधकांचे म्हणणे असे की, कारशेड आरेतून कांजूरला नेल्यास चार हजार कोटींचा जादा भुर्दंड सोसावा लागेल. प्रत्येकाचे आकडे वेगळे आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेली माहिती अगदी वेगळी आहे,” असं अग्रलेखा म्हटलं आहे.

- Advertisement -

“‘मेट्रो’ कारशेड आरेच्या जंगलातून कांजूरच्या सपाट मैदानावर नेली यावर विरोधकांना तांडव करण्याचे कारण नाही. जंगल वाचवणे व त्यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा नाही. म्हणून आरे आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरकारने मागे घ्यायचे ठरवले आहे. राजकीय गुन्हे अनेकदा मागे घेतले जातात; पण पर्यावरण रक्षणासाठी लढणाऱयांना आजन्म गुन्हेगार ठरवले जाते. खून, बलात्कार करणाऱ्यांचे समर्थन राजकीय स्वार्थासाठी सरळ केले जाते, पण ‘झाडे वाचवा, जंगले वाचवा’ असे सांगणाऱ्यांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केला जातो,” अशा शब्दांत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -