घरमहाराष्ट्ररविवारपासून राज्यात सलून,व्यायामशाळा सुरू

रविवारपासून राज्यात सलून,व्यायामशाळा सुरू

Subscribe

करोना संकटामुळे मागील महिन्यांपासून राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सलून आणि व्यायामशाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, येत्या रविवारपासून म्हणजेच २८ जूनपासून राज्यातील सलून आणि व्यायामशाळा पुन्हा सुरू होणार आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतची नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली जाणार आहे. व्यायामशाळा आणि सलून सुरू होणार असल्या तरीही अटी आणि शर्थींचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. मात्र, ब्युटीपार्लर आणि स्पा उघडण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

- Advertisement -

फक्त केस कापायला परवानगी!
राज्यात २० मार्च रोजी लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर सर्वच सलून बंद ठेवण्यात आले होते. सलून व्यावसायिकांनीही गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक स्थिती खालावली असून, व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नाभिक संघटनांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे. यावेळी सलूनमध्ये फक्त केस कापायला परवानगी देण्यात आली असून दाढी आणि इतर सेवांसाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. याशिवाय, केस कापणारा आणि ग्राहक अशा दोघांनाही मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -