संजय राऊत भ्रष्ट कारखान्याची तक्रार फडणवीसांकडे पाठवणार, हसन मुश्रीफांचा फोटो ट्वीट करत म्हणाले…

Sanjay Raut on BJP | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत आपणही एका भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण देवेंद्र फडणवीसांकडे पाठवणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले. 

Sanjay Raut on BJP | मुंबई – कथिक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने शनिवारी छापेमारी केली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना समन्स बजावलं आहे. यावरूनच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत आपणही एका भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण देवेंद्र फडणवीसांकडे पाठवणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

“मुश्रीफ यांच्या सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात ED ची कारवाई सुरू आहे. महात्मा पोपटलाल त्यावर बेंबीच्या देठापासून ओरडत आहे. अशा डझनावर साखर कारखान्यात जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. ed येथे गप्प का? उद्या एका भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण देवेंद्रजीकडे पाठवीत आहे, असं ट्वीट करत संजय राऊतांनी हसन मुश्रीफ यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतानाचा एक फोटोही पोस्ट केला आहे.


मोदींना पत्र पाठवून डोके आपटण्याचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून देशभरातील विरोधी पक्षांतील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून आरोप केले जात आहेत. त्यांच्यावर छापे टाकले जात आहेत. यावरून देशातील विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. मात्र, या पत्राबाबत अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. म्हणूनच, पतंप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणे म्हणजे भिंतीवर डोके आपटण्याचा प्रयत्न असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षात प्रचंड प्रमाणात काळय़ा पैशांची आवक आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यवहारातून म्हणजे PMLA कायद्यानुसार ‘प्रोसिड ऑफ क्राईम’मधूनच हा पैसा त्यांच्याकडे येत आहे. मनी लाँडरिंगचा व्यवहार करणारे अनेक नेते भाजपात वाजतगाजत घेतले. म्हणजे त्या ‘प्रोसिड ऑफ क्राईम’मध्ये भाजपचे हात काळे झाले हे मान्य केले तर PMLA म्हणजे मनी लाँडरिंगविरोधी कायद्यानुसार भारतीय जनता पक्षावरच कारवाई व्हायला हवी. सत्ताधारी भाजप हेच मनी लाँडरिंगचे खरे आगर आहे. मनी लाँडरिंगचे सर्व गुन्हेगार भाजपात येतात व लगेच त्यांच्यावरील ‘ईडी’च्या कारवाया थांबवल्या जातात, हे काय श्री. फडणवीस यांना माहीत नसावे? कोकणातील ‘साई रिसॉर्ट’प्रकरणी सदानंद कदम यांना ‘ईडी’ने ते आजारी असताना उचलले, पण आय.एन.एस. विक्रांतप्रकरणी लोकांकडून गोळा केलेला पैसा गायब करणाऱ्यांपर्यंत ‘ईडी’ पोहोचली नाही व श्री. फडणवीस गृहमंत्री होताच त्यांनी ही चौकशीच बंद करून चोर-लुटारूंना सरळ ‘क्लीन चिट’ दिली. भ्रष्टाचार दडपण्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. भाजप मनी लाँडरिंग राजरोस करीत आहे. ‘POC’ म्हणजे गुन्हेगारीतून आलेली माणसे व त्यांचा पैसा जिरवून ढेकर देत आहे. संपूर्ण भाजपवरच ‘मनी लाँडरिंग’चा खटला चालवायला हवा.

ते पुढे म्हणाले की, विरोधी पक्षांच्या ज्या नऊ नेत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून भिंतीवर डोके आपटण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात उभे केले पाहिजे.

नारायण राणे भ्रष्ट होते…

2019 पर्यंत भाजपच्या लेखी नारायण राणे भ्रष्ट व चोर होते. आज ते भाजपचे आदरणीय केंद्रीय मंत्री झाले. हेमंत बिस्वा सर्मा हे आता मोदी-शहांच्या अंतस्थ गोटातील मोहरा बनले आहेत. काँग्रेस पक्षातून ते भाजपात आले व आता मुख्यमंत्री बनले. काँग्रेस मंत्रिमंडळात असताना हेमंत बिस्वा सर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने लावले होते. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची एक पुस्तिकाच भाजपने पुराव्यासह प्रसिद्ध केली होती. आसाममधील पाणीपुरवठा खात्यात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला. Water Supply Scam म्हणून हा भ्रष्टाचार तेव्हा गाजला. हेच हेमंत बिस्वा सर्मा भाजपमध्ये जाताच त्यांची सगळी पापे भाजपने धुऊन घेतली.