घरमहाराष्ट्रनारायण राणे लवकरच राज्यपाल?

नारायण राणे लवकरच राज्यपाल?

Subscribe

खणखणीत नाणे ,गरज संपणे ,राजकीय किंमत घटणे,

राज्याच्या ‘राजकारणातील खणखणीत नाणे’ अशी ओळख असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रीपद येत्या काळात जाणार असून लवकरच त्यांची पूर्वेतील एका राज्याच्या राज्यपालपदावर वर्णी लागणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. नारायण राणे यांचे मंत्रीपद जाणार असल्याचा दावा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांंना उधाण आले आहे. याबाबत अनेकांकडून तर्क-वितर्क लढविण्यास सुरुवात झाली असून या महिनाअखेरीस होणार्‍या तिसर्‍या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पूर्वोत्तर राज्यात राणेंची राज्यपालपदी नियुक्ती होणार आहे.

१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागणार असल्याची माहिती आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मोदी सरकार हा विस्तार मार्गी लावण्यास उत्सुक आहे, परंतु या विस्तारादरम्यान नारायण राणे यांचे मंत्रीपद काढून घेण्यात येणार असल्याचा दावा संजय राऊतांचा आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झालेल्या बाळासाहेबांची शिवसेनेतील (शिंदे गट) काही जणांची मंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

यामध्ये लोकसभेतील बाळासाहेबांची शिवसेनेचे गटनेते खासदार राहुल शेवाळे, पक्षाच्या प्रतोद भावना गवळी यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून आणखी नव्या चेहर्‍यांना संधी देण्यासाठी मंत्रिमंडळातून काही जुन्या जाणत्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती आहे. यामध्ये नारायण राणे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते. मंत्रीपद काढून घेण्याच्या बदल्यात त्यांची कोण्या एका राज्याच्या राज्यपालपदी वर्णी लावण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मकरसंक्रांतीनंतर १६ आणि १७ जानेवारी रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपच्या केंद्रीय वर्तुळातील नेत्यांचे मंथन होणार असल्याचे समजते. शिंदे गटाला एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद देऊन त्यांची ताकद वाढवत ठाकरे गटाला शह देण्याचा भाजपचा मानस आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाचा प्रवेश होणार आणि कुणाला अर्धचंद्र मिळणार हे येणारी वेळच ठरवेल.

- Advertisement -

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर ज्या राज्यांच्या राज्यपालांकडे अतिरिक्त राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्या ठिकाणी पूर्णवेळ राज्यपालांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सध्या राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. महाराष्ट्र, मेघालय, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, तामिळनाडू आणि पंजाब या राज्यांच्या राज्यपालपदी लवकरच नव्या नेत्यांची नियुक्ती होणार असल्याचे समजते.

पीएमओमध्ये आमचीसुद्धा माणसे – राऊत

माझ्या माहितीप्रमाणे नारायण राणेंचे केंद्रीय मंत्रीपद जाणार आहे, असा खळबळजनक दावा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केला. माझ्या माहितीप्रमाणे राणेंचे केंद्रीय मंत्रीपद जाणार आहे. आता एक नवीन गट स्थापन झाला आहे. त्यांना सामावून घ्यायचे आहे. यांचा परफॉर्मन्स शून्य आहे. पीएमओमध्ये आमचीसुद्धा माणसे असतात, पण मला त्यात पडायचे नाही. तुम्ही ज्या पक्षात गेला तिथे इमान राखा. आमच्यावर आरोप करू नका, असे संजय राऊत यांनी राणेंना सुनावले.

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपशी फारकत घेतल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यात भाजप नेते नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय आघाडीवर होते, परंतु राज्यात आत्ता सत्तांतर झाले आहे. त्यामुळे आता ती गरज संपलेली आहे. ही गरज संपल्यानेच राणे यांची राजकीय किंमत घटण्यास सुरुवात झाली आहे, अशी कुजबुज आहे.

शेवाळे यांचे नाव चर्चेत
आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांचे नाव केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारल्याने लवकरच राहुल शेवाळेंसह भावना गवळी यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -