घरमहाराष्ट्रशिवशक्ती-भीमशक्ती महाराष्ट्राची ताकद, देशात परिवर्तनाची नांदी; संजय राऊतांचा दावा

शिवशक्ती-भीमशक्ती महाराष्ट्राची ताकद, देशात परिवर्तनाची नांदी; संजय राऊतांचा दावा

Subscribe

शिवशक्ती- भीमशक्ती एकत्र यावी ही शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) इच्छा होती. शिवशक्ती- भीमशक्ती महाराष्ट्राची ताकद आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे संघटन हे जर शिवसेनेसोबत आलं तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरु होईल, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वंचितसोबत स्पष्ट युतीचे संकेत दिले आहेत. राऊत आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

शिवशक्ती- भीमशक्ती एकत्र आल्यास देशात परिवर्तनाची नांदी सुरु होईल

वंचितसोबतच्या युतीबाबत राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेत चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीला या चर्चेची पूर्ण कल्पना आहे. बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेनेतील चर्चेची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांना अधिकृतपणे दिली आहे. कुणाचा विरोध आहे, कुणाचा नाही हे भविष्यात कळेल, पण विरोध आहे असं वाटत नाही. महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांना माननारी शक्ती प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली एकवटली आहे, त्याला महाराष्ट्रात मुख्य राजकीय प्रवाहात विरोध आहे, पण प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे संघटन हे जर शिवसेनेसोबत आलं तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरु होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. यावेळी जोगेंद्र कवाडे आणि शिंदे गटाच्या युतीवर बोलण्यास मात्र राऊतांनी विरोध केला.

- Advertisement -

दिल्ली, महाराष्ट्रात सत्ताकारण उलथवण्यासाठी या दोन शक्ती एकत्र येण्याची गरज

काल यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी केलेलं भाष्य सकारात्मक आहे. प्रकाश आंबेडकर अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारण काम करत आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यावी ही शिवसेनेची इच्छा होती. शिवशक्ती भीमशक्ती महाराष्ट्राची ताकद आहे. सध्या दिल्ली आणि महाराष्ट्रात ज्याप्रकारचं सत्ताकारण सुरु आहे ते उलथवण्यासाठी या दोन शक्ती एकत्र येणं गरजेचं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या स्वागतासाठी शिवसेना सदैव तयार आहे, असही राऊत म्हणाले आहेत.

केसरकरांनी २०२४ मध्ये तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी

दीपक केसरकर यांनी २०२४ पर्यंत संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार असं विधान केलं होतं, त्या विधानाला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही जेलमध्ये जाऊ, आम्ही जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहोत, आम्ही तुमच्यासारखे पळकुटे नाहीत. आम्ही तुमच्यासारखे लफंगेपण नाहीत. केसरकर म्हणजे न्यायालयात नाहीत, आणि ते कायदा नाही. दीपक केसरकर जर खरंच असं बोलले असतील तर २०२४ साली त्यांनीही तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, तयार आहे सगळं, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

योगी आदित्यनाथ यांनी गुजरातमध्ये सुद्धा गेलं पाहिजे, कारण…

मुंबई बिझनेस सेंटर आहे. जर कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत येत असतील आणि आपल्या राज्याच्या विकासाठी चर्चा करण्यासाठी मुंबईत निवडत असतील तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही, यापूर्वीही योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये फिल्मसिटी काढण्याची घोषणा केली होती. पण योगी आदित्यनाथ यांनी गुजरातमध्ये सुद्धा गेलं पाहिजे, कारण मुंबईचे औद्योगिक नियंत्रण समितीचे कार्यालय हे गुजरातला हलवले आहे. तिथे जाऊन सुद्धा त्यांचा फायदा होईल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

महावितरणचे कर्मचारी संप काढत आहे. हे सरकारचे अपयश आहे. या सरकारला याची माहिती होती तरीही कोणताही निर्णय घेतला नाही, आज महाराष्ट्र अंधारात आहे याला सरकार जबाबदार, असा आरोपही राऊतांनी केला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -