घरमहाराष्ट्र१२ सदस्य तालिबानी किंवा गुंड नाहीत, राज्यपालांनी दबाव असेल तर सांगावं -...

१२ सदस्य तालिबानी किंवा गुंड नाहीत, राज्यपालांनी दबाव असेल तर सांगावं – संजय राऊत

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटसंदर्भात शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यपाल लवकरच निर्णय घेतील, असं सूचक वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी १२ सदस्य हे तालिबानी नाहीत. राज्यपालांनी दबाव असेल तर तसं सांगावं, असं देखील राऊत म्हणाले.

राज्यपाल राजकीय दबावामुळे निर्णय घेत असतील तर त्यांनी ते जाहीरपणे सांगावं. राजभवन आणि सरकारमध्ये आतापर्यंत संघर्ष झाल्याचा इतिहास नाही आहे. त्यामुळे जर संघर्ष होत असेल तर का होता याचा विचार राजभवनने करावा, असं राऊत म्हणाले. पुढे त्यांनी उच्च न्यायालयाने याप्रकरणात पडण्याची गरज नाही. मंत्रिमंडळाने दिलेल्या नावांना राज्यपालांनी मंजुरी देणं हे त्यांचं काम आहे. हे १२ आमदार तालिबानी आणि गुंड नाही आहेत. ते कलाकार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा, असं आवाहन करत कालच्या भेटीनंतर राज्यपाल सकारात्मक निर्णय घेतील असं वाटतंय, असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

आमदार नियुक्तीप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

जवळपास १० महिन्यांपासून रखडलेल्या विधानपरिषदेतील राज्यपाल नामनियुक्त १२ आमदारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांना राज्यातील एकूण परिस्थितीची माहिती देण्यात आली. तसेच या नियुक्तीबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आली. यावेळी राज्यपालांनी आपण योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याची माहिती अजित पवार यांनी भेटीनंतर दिली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ६ नोव्हेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीच्या पत्रानिशी बंद लाखोट्यात राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना सादर केली होती. मात्र, या यादीवर अजून निर्णय झालेला नाही. विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त सदस्यांचा विषय न्यायालयातही गेला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार असे ठरले होते.गेल्या आठवडयातच ही भेट होणार होती. मात्र राज्यपालांचे अन्य काही कार्यक्रम असल्याने ही भेट टळली.

- Advertisement -

बुधवारी अखेर ही भेट झाली. आपण या प्रकरणी योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन राज्यपालांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना दिले आहे. दरम्यान,या १२ मधील काही नावांबाबत राज्यपालांचा आक्षेप असल्याची चर्चा सुरू होती. मात्र राज्यपालांनी असा कोणत्याही नावाला आक्षेप असल्याचे सांगितलेले नाही. त्यामुळे या १२ नावांना लवकरात लवकर मंजुरी द्यावी,अशी विनंती करण्यात आली आहे. विधिमंडळ अधिवेशन काळात विधानपरिषदेत कमी संख्याबळ असते ही बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्याचे पवार यांनी सांगितले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -