School Reopen : एकदा उघडलेल्या शाळा बंद होऊ नये या निर्धाराने सुरुवात करु, मुख्यमंत्र्यांचे शिक्षकांना आवाहन

विद्यार्थ्यांची काळजी घेणं ही महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर आली आहे.

School Reopen Cm uddhav thackeray appeal school teachers to Obey corona guidelines for student safety
School Reopen : एकदा उघडलेल्या शाळा बंद होऊ नये या निर्धाराने सुरुवात करु, मुख्यमंत्र्यांचे शिक्षकांना आवाहन

राज्यभरात शहरी भागात ८ वी ते १२ वी आणि ग्रामीण भागात ५ वी ते ८वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी व्हिसीद्वारे संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालकांना आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. तसेच एकदा सुरु करण्यात आलेल्या शाळा पुन्हा बंद होऊ नये अशा निर्धाराने सुरुवात करुया असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभाग आणि शिक्षकांना केलं आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणं कठीण होते परंतु राज्यातील टास्क फोर्सशी चर्चा करुन हा निर्णय घेतला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय दिला असून आजपासून विद्यार्थी शाळेत जायला लागले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या शाळेतील दिवसांची आठवण सांगितली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शाळेतले दिवस मला आठवत आहेत. आता सगळ्यांनाचा शाळेतील दिवस आठवत असतील सुट्टी नंतरचा शाळेचा पहिला दिवस खुप उत्साहाने भरलेला असायचा. पुर्वी पावसाची सुरुवात रिमझिम पावसाने सुरु व्हायचे, नवा वर्ग, नवा गणवेश, नवे मित्र आणि आपल्या मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची आणि शाळेचं आयुष्य सुरु व्हायचे. एकेक वर्ष कसे आता आठवणं पण कठीण झालं अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी, पालक, शिक्षकांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांची काळजी घेणं ही महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर आली आहे. ही जबाबदारी आपण पार पाडू आणि एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होऊ देणार नाही अशा निर्धाराने आजपासून सुरुवात करुया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

शाळेबाबतचा निर्णय कठीण होता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणे कठीण होते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातील टास्क फोर्ससोबत चर्चा करुन शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच शिक्षकांना आणि पालकांना विनंती केली आहे की, आपल्या विद्यार्थ्यांची आणि पाल्यांची काळजी घ्या, विद्यार्थ्यांना बरं वाटत नसेल तर तातडीने चाचणी करुन घ्या. पावसाळा संपल्यानंतर ऑकोबर हीट सुरु होईल त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आजारी झाल्यास त्यांची तात्काळ चाचणी करुन घ्या आणि कोरोना नाही ना याची पडताळणी आवश्य करा असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शिक्षकांना सुचना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना आणि शाळा प्रशासनांना आवाहन केलं आहे. शाळेत कुठेही वर्ग शिक्षणाची जागा बंदिस्त असता कामा नये, दारे खिडक्या उघड्या हव्यात, हवा खेळती असली पाहिजे. निर्जंतुकीकरण करताना विद्यार्थी जवळपास नसतील याची खात्री करा, विद्यार्थी बसतील तेव्हा मास्क घालण्याचे पालन करा, स्वच्छतालय स्वच्छ करा, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.


हेही वाचा : राज्यात आजपासून शाळेची घंटा वाजणार, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी