घरमहाराष्ट्रशहापूरची भेंडी शेतकर्‍यांना वरदान

शहापूरची भेंडी शेतकर्‍यांना वरदान

Subscribe

परदेशातून मागणी वाढली

शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी भातसा जलाशयाच्या कालव्याचे पाणी आणि कानवी नदी ओव्हळाच्या पाण्यावर उन्हाळी मोसमात भाजीपाल्याची लागवड केली आहे. यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली असून शेतकर्‍यांनी पिकवलेली भेंडी व्यापार्‍यांकडून ही भेंडी 35 ते 40 रुपये दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे गरीब शेतकर्‍यांसाठी भेंडी वरदान ठरली आहे. ग्रामीण भागातील या भेंडीला आता परदेशातूनही मागणी होत असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

तालुक्यातील साजीवली, सरलांबे , खरीवली, कवडास, तुते, आवरे, कांबारे, सापगाव, खुटघर अंदाड, हिव आदी परिसरासह भातसई, शेई, शेरा अंबर्जे, मढ, नेहरोली नडगाव, शिरगाव, लेनाड शेंद्रुण, यांसह किन्हवली परिसरात मळेगाव, बेडीसगाव, परटोली, मुगाव, कानवे, चेरवली, चरीव, आपटे, खरांगण, गेगाव, नांदवळ, आस्नोली मुगाव, शेलवली, शिळ,आदी गावागावातील शेतकरी दरवर्षी हिवाळा आणि उन्हाळ्याच्या मोसमात भाजीपाला लागवड करतात. भातशेतीबरोबर जोडधंदा म्हणून वांगी, घोसाळी, शिरावळे,गवार, कारली,भोपळा,शिमला मिरची,काकडी, टोमॅटो यासोबतच यंदा भेंडीची सर्वाधिक लागवड केली आहे.

- Advertisement -

शहापूरात या वर्षी भेंडीचे विक्रमी उत्पन्न झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात भेंडीची आवक कृषी उत्पन्न बाजार समितीतीत वाढली आहे. शेतकर्‍याच्या मळ्यातून निघणारी ही भेंडी खरेदीसाठी वाशी, दादर अशा भाजी मंडईतील मोठे व्यापारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज दाखल होत आहेत. येथेच भेंडी उत्पादक शेतकरी भेंडी विक्रीसाठी आणतात व्यापार्‍यांकडून ही भेंडी जागेवरच 35 ते 40 रुपये किलोच्या भावाने शेतकर्‍यांकडून खरेदी केली जात आहे. पुढे हीच भेंडी शहरातून व्यापार्‍यांकडून दुप्पट भावाने खरेदी करुन परदेशात सातासमुद्रापार निर्यात होते. भेंडीला युरोप ब्रिटन आणि आखातातील अरब देशांमधून मागणी वाढत असल्याचे या व्यवसायातील व्यापारी सांगतात.

शहापूरच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत सुमारे 1000 ते 2000क्विंटल भेंडीची आवक होत असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षी भेंडीला चांगला भाव मिळत असल्याने गुंतवणुकीपेक्षा अधिक पैसे मिळू लागल्याने शेतकरी समाधानी आहे. शहापूरच्या शेतकर्‍यांना भेंडीलागवडीचा मोठा आधार मिळाला असून रोख पैसे मिळवून देणारी भेंडी शेतकर्‍यांसाठी एकप्रकारे वरदान ठरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -