घरमहाराष्ट्र'राज ठाकरेंची मागणी चुकीची', शरद पवारांची प्रतिक्रिया

‘राज ठाकरेंची मागणी चुकीची’, शरद पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

राज ठाकरे एकीकडे इव्हीएमविरोधात जनमत तयार करण्यासाठी विविध विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत असतानाच शरद पवारांनी मात्र राज ठाकरेंची मागणी अवास्तव असल्याचं म्हटलं आहे.

राज ठाकरेंची शरद पवारांशी आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक असल्याची जोरदार चर्चा नेहमीच होत असते. तसेच, इव्हीएमच्या मुद्द्यावर त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यापासून शरद पवार देखील निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतील का? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मुद्द्यावर थेट आक्षेप घेतला आहे. ‘ईव्हीएमबाबत अनेक राजकीय पक्षांना शंका आहेत. त्याबद्दल न्यायालयातही दाद मागितली आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईव्हीएम प्रकरणी निवडणुकीवरच बहिष्कार घालावा अशी मागणी केली असून, ती आम्हाला गैरवाजवी वाटते’, असं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मनसेसोबत आघाडीबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे देखील अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

‘भाजपला पाठिंब्याचा निर्णय परिस्थितीमुळेच’

पवार म्हणाले की, ‘काँग्रेससोबत आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. प्रत्येकी १२५ जागांवर आमचे एकमत झाले आहे. इतर पक्षांसोबत आघाडी बाबत चर्चा सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, आरपीआय कवाडे गट यांनाही जागा सोडाव्या लागणार आहेत. राज ठाकरेंसोबत माझी भेट झाली. त्यांनी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली आहे. ईव्हीएम मशीनबाबत त्यांनाही शंका आहे. ईव्हीएमला विरोध म्हणून निवडणुकीवर बहिष्कार घालावा, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र, बहिष्कार हा मार्ग नाही, असं आपलं मत असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच, ‘वंचित बहुजन विकास आघाडीबाबत चर्चा झाली नाही. परंतु ज्यावेळी आघाडी म्हणून विचार करायचा असतो, त्यावेळी काही बाबतीत शिथिल धोरण ठेवावे लागते’, असेही पवार यांनी नमूद केले. ‘२०१४ मध्ये भाजपला न मागता पाठिंबा देणे हा त्यापरिस्थितीत घेतलेला निर्णय होता’, असे सांगत पवारांनी यावेळी त्यावर भाष्य करणे टाळले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांबाबत पवारांनी केला गौप्यस्फोट – मुख्यमंत्री स्वत: आमदारांना फोन करताहेत!

इंदापूर कुणाच्या खात्यात?

दरम्यान, २०१४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्यामुळे इंदापूरच्या जागेवर दोघांनी उमेदवार दिले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे विजयी झाले होते. यंदा मात्र दोन्ही पक्ष आघाडीत लढणार आहेत. त्यामुळे इंदापूर कुणाच्या वाट्याला जाणार? यावर उत्सुकता आहे. सुप्रिया सुळे यांना इंदापूरमधून मोठा पाठिंबा मिळतो. यावर बोलताना पवार म्हणाले, ‘जो निवडून आला त्याचा जागेवर अधिकार, असे जागा वाटपाचे संकेत आहेत. त्यात दुमत असण्याचे कारण नाही’. त्यामुळे पवारांनी दुसऱ्या शब्दांत इंदापूर राष्ट्रवादीकडेच राहील असं सूचित केलं आहे. मात्र, त्याचवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी, ‘इंदापूर मतदारसंघ काँग्रेसचाच असून त्यावर चर्चेतून मार्ग काढू’, असं म्हटलं आहे. त्यामुळे या मतदारसंघावरून दोन्ही काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं स्पष्ट झालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -