घरमहाराष्ट्रबलात्कारप्रकरणी शेवाळेंकडून थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा, राष्ट्रवादीचं नाव घेत जोडलं दाऊद कनेक्शन

बलात्कारप्रकरणी शेवाळेंकडून थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा, राष्ट्रवादीचं नाव घेत जोडलं दाऊद कनेक्शन

Subscribe

मुंबई – शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) सध्या बलात्कार आणि फसवणूक प्रकरणात एसआयटी चौकशीच्या (SIT Inquiry) फेऱ्यात अडकले आहेत. मात्र, याप्रकरणावर त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Yuvasena Leader Aditya Thackeray) आणि राष्ट्रवादीवर (NCP) गंभीर आरोप केले आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक माझं वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय करिअर संपवण्यासाठी कटकारस्थान रचले आहे. दाऊद गँगशी (Dawood Gang) संबंधित असलेल्या महिलेचं नाव माझ्यासोबत जोडण्यात आलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या कुटुंबातून संबंधित महिला आहे, त्यामुळे मला या प्रकरणात गोवण्यात आलं आहे, असे एक ना अनेक आरोप राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषदेत केलेत. तसंच, या प्रकरणाची एनआयएने चौकशी करून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

राहुल शेवाळे यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप केला जातोय. याप्रकऱणात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असला तरीही त्याविरोधात कारवाई होत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदार डॉ.मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत केला होता. याप्रकरणात विधान परिषदेत गोंधळ झाल्याने राहुल शेवाळे प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश सभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. यावरून राज्यात घमासान सुरू असताना राहुल शेवाळे यांनी आज अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – आता राहुल शेवाळे अडचणीत, बलात्कारप्रकरणात एसआयटी चौकशीचे निर्देश

संबंधित महिला गुन्हेगारी कुटुंबातील

- Advertisement -

ज्या महिलेने माझ्यावर आरोप केले आहेत ती गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहे. तिच्या भावावर आणि वडिलांवर गंभीर आरोप आहेत. एवढंच नव्हे तर संबंधित महिला पाकिस्तानी गँगशी संबंधित असल्याचा धक्कादायक खुलासा राहुल शेवाळे यांनी आज केला. तसंच, या महिलेचे दाऊद गँगशीही संबंध असल्याचं शेवाळेंनी स्पष्ट केलं. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी एनआयए चौकशी लावावी अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.

कोविड काळात संबंधित महिलेला आर्थिक मदतीची गरज होती. त्यामुळे इतरांना मदत केली त्याप्रमाणे या महिलेलाही कोविड काळात मी मदत केली. माझा दुबईतील मित्र रेहमान याच्या सांगण्यावरून मी तिला मदत केली. मात्र, कालांतराने तिच्या अपेक्षा वाढत गेल्या. ती मला ब्लॅकमेलिंग करू लागली. मी जेव्हा पैसे देणं थांबवलं तेव्हा तिने माझे खोटे फोटो काढले, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे.

हेही वाचा – राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप संसदेच्या कामकाजातून वगळले

सप्टेंबर २०२१ मध्ये तिच्या भावाने दिल्लीत खून केला. पत्नीच्या समोरच पतीची हत्या करण्यात आली होती. पत्नीने दिलेल्या जबाबानुसार, या हत्येत संबंधित महिलाच प्लॅनर असल्याचं समोर आलं होतं. यामुळे संबंधित महिला दिल्लीहून दुबईला पळून गेली. दुबईला गेल्यावर या महिलेने सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करून ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. माझ्या पत्नीलाही धमक्या दिल्या. त्यामुळे आम्ही तिच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर गुन्ह्याअंतर्गत एफआयआर दाखल झाला. दुबई पोलिसांच्याही ही गोष्ट लक्षात आणून दिली. त्यानुसार, दुबई पोलिसांनी तिला एका प्रकऱणात अटक केली. या प्रकरणात ती ८६ दिवस तुरुंगात होती. त्यानंतर शार्जा कोर्टाने तिची दुबईतून हकालपट्टी केली, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.

पुन्हा एप्रिलमध्ये या महिलेच्या कारवाया सुरू झाल्या. माझ्या पत्नीचे फेक अकाऊंट बनवून धमकावू लागली. आम्ही तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट तपासलं असता त्या अकाऊंटला युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फॉलो करत असल्याचं दिसलं. युवासेनेचे अनेक पदाधिकारी या महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मी ज्या पक्षात होतो त्याच पक्षातील लोकच त्या महिलेशी संपर्क साधत होते आणि माझ्याविरोधात तक्रार दाखल करण्यास प्रवृत्त करत होते.

हेही वाचा – सुशांतसिंह मृत्यूप्रकरण : आदित्य ठाकरेंवर राहुल शेवाळेंचे लोकसभेत गंभीर आरोप

या महिलेने माझ्याविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर मीही या महिलेविरोधात क्रॉस तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेचा आणि माझा जबाब घेतला. मात्र, माझ्या तक्रारीवर महिन्याभरात कारवाई झाली नाही त्यामुळे मी अंधेरी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने माझ्या तक्रारीवर कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, साकीनाका पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला. मात्र, कारवाई सुरू केली नाही, असा आरोपही शेवाळेंनी केला.

या प्रकरणात कारवाई होऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून कटकारस्थान रचले जात होते. माझ्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून वरिष्ठ पोलिसांनाही राष्ट्रवादीकडून आदेश देण्यात आले होते. पोलिसांना तपासाअंती आरोपांमध्ये तथ्य वाटलं नाही. अंधेरी कोर्टात माझी बाजू मी मांडली. ही ब्लॅकमेलिंगची केस असल्याने यात कारवाई झाली पाहिजे, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानुसार, गुन्हा नोंदवत साकीनाका पोलीस सदर महिलेलाल शोधत आहेत. मात्र, इमेलद्वारे या महिलेशी संपर्क साधूनही महिला पोलिसात येत नाही. पत्रव्यवहार करूनही ती आली नाही, असं शेवाळेंनी सांगितलं.

माझ्या पत्नीनालाही धमक्या येत असल्याने तिने गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिल्लीच्या पत्त्यावर गोवंडी पोलिसांना सदर महिला सापडली नाही. शिवसेना सोडून गेल्यावर हे प्रकरण उचलण्यात आलं. युवासेनेचे पदाधिकार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अपप्रचार सुरू केला, असा आरोपही शेवाळेंनी आज केला.

देशातील पाच-सहा ठिकाणचे पोलीस ज्या महिलेला शोधत आहे त्या महिलेला राष्ट्रवादीची प्रवक्ता टीव्हीवर घेऊन येते. युवासेनेच्या प्रमुखांमुळेच हे सर्व घडलं आहे. या संपूर्ण प्रकरणामागे कोण आहे याचा मी गेले वर्षभर तपास करत होतो. पण यामागे युवासेनेचे प्रमुख आहेत हे धक्कादायक आहे. हा माझ्याविरोधातील कटकारस्थानाचा डाव आहे, असं राहुल शेवाळे म्हणाले.

या महिलेचे दाऊदशी संबंध आहेत. तसंच, राष्ट्रवादीचेही दाऊद गँगशी संबंध असल्याचं सर्वांना माहित आहे. अशा दाऊद गँगशी संबंधित महिलेवरून माझा संसार आणि राजकीय करिअर खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं राहुल शेवाळे म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -