घरमहाराष्ट्रराज्य गहाण ठेवणारे तुम्ही कोण? उध्दव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राज्य गहाण ठेवणारे तुम्ही कोण? उध्दव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Subscribe

‘बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा दिला जाईल, प्रसंगी राज्य गहाण ठेवावे लागले तरी चालेल’, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नुकतेच केले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधक त्यांच्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. गुरुवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यापाठोपाठ आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या सामना मुखपत्रातून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ‘स्मारकासाठी पैसे नाहीत, राज्य गहाण ठेवू म्हणणारे तुम्ही कोण’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सामनामधून मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. ”अतिउत्साही वक्तव्यांमुळे सरकारची, राज्याची इभ्रत गहाण ठेवण्याची वेळ येऊ शकते. मुख्यमंत्री महोदय, टाळीच्या वाक्यांसाठी जीभ घसरू देऊ नका”, अशी टीका ठाकरे यांनी सामनामधून केली आहे.

‘डॉ. आंबेडकर आज हयात असते तर राज्य गहाण ठेवण्याची भाषा करणाऱ्या राज्यकर्त्यांवर काठीच उगारली असती’ असा टोला उध्दव ठाकरेंनी लगावला आहे. याशिवाय ‘फडणवीसांचे हे वक्तव्य म्हणजे राज्य आर्थिकदृष्टया डबघाईला आले असताना कर्ज काढून सण-उत्सव साजरे करण्याचा प्रकार आहे’, अशी टीका उध्दव ठाकरेंनी केली आहे.

- Advertisement -

जाहिरातींच्या पैशावर कात्री लावा

भाजप सरकार जाहिरातींवर करोडो रुपयांची उधळपट्टी करत असल्याची टीकाही उध्दव यांनी केली आहे. ‘प्रत्येक निवडणुकीत भाजप विजांचा कडकडाट व्हावा तसा पैशांचा पाऊस पाडत असतो. सत्ता मिळवायला पैसे आहेत पण आंबेडकरांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवण्याची भाषा होते. त्यामुळे सरकारी जाहिरातींवर होणाऱ्या वारेमाप खर्चावर कात्री लावली जावी’, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी सामनामधून दिला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी इंदू मिलमध्ये आले तेव्हा स्मारकासाठी पैसा कमी पडणार नाही असे म्हणाले होते. त्यामुळे यासाठीच आता महाराष्ट्र राज्य गहाण ठेवून पैसा उभारला जाणार, असा अर्थ जनतेने घ्यायचा का?’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

गुजरात गहाण ठेवलेले नाही

‘गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा नर्मदा नदीच्या पात्रात उभारण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पुतळ्याची उंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित पुतळ्यापेक्षाही जास्त आहे. मात्र, सरदार पटेल यांच्या या पुतळयासाठी तेथील भाजप सरकारने गुजरात राज्य गहाण ठेवलेले नाही’, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -