शिवसेनेला मिळालेल्या देणगीमध्ये कमालीची घट

Shivsena
शिवसेना

राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला देणगी स्वरुपात मिळणार्‍या पैशांमध्ये घट झाली आहे. २०१९ साली शिवसेनेला मिळालेली नॉन कार्पोरेट देणगी १८ कोटी ६१ लाख ५६ हजार ४३३ रुपये होती. मात्र, त्यात घट होऊन २०२०-२१ साली शिवसेनेला फक्त ६८ लाख ९३ हजार ९७४ रुपयांची नॉन कार्पोरेट देणगी मिळाली आहे. २०१९ साली निवडणुका होत्या त्यामुळे देणगी जास्त होती, असे कारण शिवसेनेकडून देण्यात आले असले तरी भाजपची साथ सोडल्यामुळे शिवसेनेची देणगी आटली, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी आपल्या वेबसाइटवर शिवसेनेचा देणगी अहवाल अपलोड केला. शिवसेनेचे सचिव आणि राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांनी गेल्या महिन्यात निवडणूक आयोगाला हा अहवाल सादर केला. या अहवालात ४९ देणगीदारांची यादी आहे, ज्यांनी शिवसेनेला २०,००० रुपयांहून अधिकची देणगी दिली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी शिवसेनेने कॉर्पोरेट देणगीदारांकडून ४४ कोटी २४ लाख ३५ हजार ९९६ रुपयांची देणगी जाहीर केली होती. आणि नॉन-कॉर्पोरेट देणगीदारांकडून १८ कोटी ६१ लाख ५६ हजार ४३३ रुपये देणगी मिळाली होती. म्हणजेच शिवसेनेला २०१९-२० मध्ये एकूण ६२ कोटी ८५ लाख ९२ हजार ४२९ रुपये (६२.८५ कोटी) देणगी मिळाली होती.

पण २०१९ च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये शिवसेनेला मिळणार्‍या नॉन-कॉर्पोरेट देण्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. यावर शिवसेनेने स्पष्टीकरण दिले आहे. २०१९ हे विधानसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने देणग्या जास्त होत्या, असे शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी स्पष्ट केले. २०१८-१९ मध्ये शिवसेनेला कॉर्पोरेट देणगीदार आणि इलेक्टोरल बाँड्सकडून ९८ कोटी ०८ लाख १३ हजार ६०१ रुपये आणि नॉन-कॉर्पोरेट देणगीदारांकडून ३२ कोटी ५५ लाख १६ हजार २०४ रुपये मिळाले होते. म्हणजे २०१८-१९ मध्ये शिवसेनेला एकूण १३० कोटी ६३ लाख २९ हजार ८०५ (१३०.६३ कोटी रुपये) देणगी मिळाली होती.