घरमहाराष्ट्रनाशिकमनमाडच्या पानेवाडी प्रकल्पातही कोरोनाचा शिरकाव

मनमाडच्या पानेवाडी प्रकल्पातही कोरोनाचा शिरकाव

Subscribe

अधिकारी-कर्मचारी, इंधन वाहतूक करणार्‍यांची वाढली चिंता

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांसोबत कोरोनाच्या रडारवर आता मनमाड शहरातील शासकीय कार्यलय आले असून, काही दिवस अगोदर शहरातील एका महाविद्यालयातील शिक्षक कोरोनाच्या विळख्यात सापडल्याची घटना ताजी असताना त्या पाठोपाठ आता आणखी एक विद्यालय आणि भारत पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. प्रकल्पातील एका वरिष्ठ अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाली असल्याचे कळताच इतर अधिकारी, कर्मचारी आणि प्रकल्पातून इंधनाची वाहतूक करणारे चालक-क्लिनर यांच्यात खळबळ उडाली आहे.

शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून एका दिवस ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकीकडे शहरात कोरोनाचे पुनरागमन होऊन काही जण त्याच्या विळख्यात सापडलेले असताना दुसरीकडे मात्र बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी तर होत आहेच मात्र अनेक नागरिक मास्क देखील घालत नाही. त्यामुळे नागरिकांच्या या बेफिकरीमुळे शहरात कोरोनाचा विस्फोट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

पहिल्या आणि दुसर्‍या लाटेने शहर परिसरात अक्षरश: कहर केला होता. त्यावेळी अनेक सर्वसामान्य नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. काहींचा मृत्यू देखील झाला आहे शिवाय त्यावेळी शहरातील अनेक शासकीय कार्यालयांत देखील कोरोनाचा शिरकाव होऊन अधिकारी कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याची पुनरावृत्ती होत असून शहरातील इंडियन हायस्कूलमधील एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. ही घटना ताजी असताना आता छत्रे हायस्कूलमधील एका शिक्षिकेला कोरोनाचा लागण झाली आहे.

महत्त्वाच्या दोन विद्यालयातील शिक्षकाना कोरोनाची लागण झाल्यामुळे इतर शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. तिकडे शहरापासून ७ कि.मी. अंतरावर असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातही कोरोनाचा शिरकाव होऊन एका वरिष्ठ अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.

- Advertisement -

त्यामुळे प्रकल्पातील इतर अधिकारी, कर्मचारी आणि प्रकल्पातून इंधनाची वाहतूक करणारे टँकर चालक आणि क्लिनर यांच्यात खळबळ उडाली आहे. शहरात कोरोनाचे नवे ४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाने शहरात पुन्हा डोके वर काढले असल्याने नागरिकांनी मास्क वापरून बाजारपेठेत गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -