घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरLok Sabha 2024 : छ. संभाजीनगर लोकसभेसाठी शिंदे गट-भाजपचा दावा; खैरे-दानवे दिलजमाई...

Lok Sabha 2024 : छ. संभाजीनगर लोकसभेसाठी शिंदे गट-भाजपचा दावा; खैरे-दानवे दिलजमाई कोणाला पडणार भारी?

Subscribe

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यानंतरही महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले आहे. मात्र महायुतीमध्ये हे मतदारसंघ कोणाला सुटणार याचाच तिढा सुटताना दिसत नाही. आज (रविवार) या तिन्ही जागांसाठी मुंबईत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.

शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे, उस्मानाबादमध्ये विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरच पुन्हा डाव लावला आहे. खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात दिलजमाई झाल्याचेही आता समोर आले आहे. मात्र महायुतीत या तिन्ही जागा नेमक्या कोणत्या पक्षाला सोडायच्या हेच ठरत नाही. नाशिकसाठी स्थानिक भाजपनेते आग्रही आहेत.

- Advertisement -

खैरे – दानवे यांची दिलजमाई

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला. 2019 मध्ये एमआयएम-वंचित आघाडीने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आणि इम्तियाज जलील येथून विजयी झाले. आता पुन्हा एकदा एमआयएमने खासदार जलील यांना येथून उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा चंद्रकांत खैरे यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे काही दिवस स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वादाचे वातावरण होते. विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना येथून उमेदवारीची अपेक्षा होती. अखेर त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य करत आज चंद्रकांत खैरेंची भेट घेऊन त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. त्यांचा प्रचार करण्याचेही मान्य केले. दोघांनी एकमेकांना पेढा भरवून त्यांच्यात दिलजमाई झाली. खैरे – दानवे यांची दिलजमाई महायुतीच्या उमेदवाराला भारी पडणार की, महायुती, महाविकास आघाडीची मतविभागणी इम्तियाज यांच्या पत्थ्यावर पडणार हे पाहणे महत्त्वाचे राहाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : BharatRatna : पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींचा अपमान; भारतरत्न देताना द्रौपदी मुर्मू उभ्या अन् मोदी खुर्चीवर बसून

शिवसेना शिंदे गटाच्या जागेवर भाजपचा डोळा 

शिवसेनेच्या कोट्यातील ही जागा असली तरी शिंदे गटाला औरंगाबाद लोकसभा सोडण्यास भाजपचा नकार आहे. राज्यसभेतील भाजपचे खासदार तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड येथून निवडणूक लढू इच्छित आहेत. तर पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे चिरंजीव देखील शिंदे गटाकडून आग्रही आहेत. यामुळे औरंगाबाद लोकसभेचा पेच सुटताना दिसत नाही. महायुतीमध्ये नाशिक, उस्मानाबाद आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावरुन सध्या घमासान सुरु आहे. भाजप शिंदे गटाच्या अनेक जागांवर दावा करत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या या मतदारसंघात एकदा भाजपने प्रवेश केला तर शिवसेना शिंदे गटाला पुन्हा संधी मिळणार नाही, अशी स्थानिक नेत्यांची भावना आहे. शिंदे गटाच्या हिंगोली येथील उमेदवारावरही भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उस्मानाबाद जागेवरही भाजपने दावा सांगितला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते, कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे.

औरंगाबाद पश्चिमचे आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी लोकसभा शिंदे गटच लढवणार असल्याचा दावा केला आहे, मात्र शिंदे गटाकडे उमेदवार कोण आहे? असा सवाल विरोधक करत आहेत. त्यामुळे या बहुचर्चित लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होणार, याची महाराष्ट्राला उत्सूकता लागून राहिली आहे.

हेही वाचा : Ramlila Maidan : एक व्यक्ती-एक पक्षाचे सरकार घालवण्याची वेळ आली; रामलीला मैदानावरुन उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -