घरमहाराष्ट्रराणे-सेना वाद चिघळणार? राणेंविरोधातील जुन्या प्रकरणांची चौकशी करण्याचा 'सामना'तून इशारा?

राणे-सेना वाद चिघळणार? राणेंविरोधातील जुन्या प्रकरणांची चौकशी करण्याचा ‘सामना’तून इशारा?

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष वाढणार असे संकेत दोन्ही बाजूंकडून मिळतायत. राणे आणि भाजपपने शिवसेनेची जुनी प्रकरणं उकरुन काढण्याची धमकी दिल्यावर आता शिवसेनेने सुद्धा राणे यांच्या जुन्या प्रकरणांची चौकशी करण्याचा ‘सामना’तून इशारा दिला आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखात राणेंच्या मुद्द्यावरुन भाजपवरही निशाणा साधण्यात आला.

नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरुन पोलिसांनी उठवलं, असा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला. याचा व्हिडिओ देखील लाड यांनी प्रसिद्ध केला. यावरुन शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखात राणेंच्या जुन्या प्रकरणांचा उल्लेख केला आहे. “राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवले व अटक केली असे त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती. राणे यांना जेवणावरून उठवणे वाईटच; पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरून, भरसंसारातून कायमचे कोणी उठवले याचा नव्याने तपास ‘ठाकरे’ सरकारने करायला हवा,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

- Advertisement -

भाजपने आता तरी शहाणे व्हावे

“कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारून पडण्याइतके सोपे नाही. हा महाराष्ट्र आहे, तरीही ‘वर आमचे सरकार आहे! महाराष्ट्र केंद्राशी काय संघर्ष करणार?’ अशी मस्तवाल व महाराष्ट्रविरोधी भाषा राणे नावाचे केंद्रीय मंत्री वापरतात. महाराष्ट्राच्या अस्मितेची इतकी नाचक्की महाराष्ट्राच्या दुष्मनांनीही कधी केली नव्हती. राणे हे ‘नॉर्मल’ मनुष्य नसल्यानेच त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखले. भाजपने आता तरी शहाणे व्हावे!” असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

कायदा सगळ्यांसाठी सारखाच

“राज्यात इकडे तिकडे थोडे काही झाले की, विरोधी पक्षाची कुंडलिनी जागी होते व राज्यात कायद्याचे राज्य आहे काय, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातो. यापुढे महाराष्ट्रात विरोधकांकडून हे असले प्रश्न विचारले जाणार नाहीत. भारतीय जनता पक्षाचे ‘पर’आत्मा नारायण राणे यांच्यावर कायद्यानेच कारवाई झाली व माणूस ‘नॉर्मल’ असो वा राणेंसारखा ‘अॅबनॉर्मल,’ कायदा सगळ्यांसाठी सारखाच हे राज्याच्या पोलिसांनी दाखवून दिले,” असं शिवसेनेने अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

फडणवीसांकडून ही अपेक्षा नाही

“राणे यांची अटकही इतर सामान्य गुन्ह्याप्रमाणे आहे. असे गुन्हे इकडे तिकडे घडतच असतात. कोणीतरी कुणाला धमक्या देतो, जीवे मारू असे बोलतो. त्यावर समोरची फिर्यादी व्यक्ती इंडियन पिनल कोडप्रमाणे गुन्हा दाखल करते. पुढे पोलीस आपले काम करतात. राणे यांच्याबाबतीत वेगळे असे काहीच घडल्याचे दिसत नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्रात तालिबानी पद्धतीचे राज्य सुरू आहे काय?’ वगैरे सवाल विरोधी पक्षाने उपस्थित करणे निरर्थक आहे. ”राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचे वक्तव्य केले ते आम्हाला मान्य नाही, पण राणेंवरील कारवाई योग्य नाही,” हे विधान फडणवीस वगैरे लोक करतात ते कोणत्या आधारावर? अबलेवर एखाद्याने अत्याचार केला, पण त्याच्या मनात तशी काही विकृत भावना नव्हतीच हो, तेव्हा आरोपीला निर्दोष सोडा व पुढचे गुन्हे करण्यासाठी मोकळीक द्या, अशाच प्रकारचा हा युक्तिवाद आहे. काही काळ वकिली (फौजदारी) करणाऱ्या फडणवीसांकडून ही अपेक्षा नाही,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.


हेही वाचा – अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना मोदी, शहांचा फोन


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -