घरमहाराष्ट्रनाशिकश्रावण सोमवार विशेष : हत्ती-घोडे, नोकर-चाकर घेऊन बुटी सरकारने शोधले "सोमेश्वर"

श्रावण सोमवार विशेष : हत्ती-घोडे, नोकर-चाकर घेऊन बुटी सरकारने शोधले “सोमेश्वर”

Subscribe

नाशिक शहरातील अनेक प्रसिध्द शिवमंदिरांपैकी एक म्हणजे सोमेश्वर महादेव मंदिर. स्वातंत्र्यपूर्वकाळापासून शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या या सोमेश्वर मंदिराची कथा फारच रोचक आहे. एका आख्यायिकेनुसार, पुरातन काळात नागपूर येथील सरदार बुटी सरकार यांना स्वप्नात दृष्टांत देत भगवान सोमेश्वरांनी मी नाशिक येथील गंगापूर गावात आहे, मला बाहेर काढ, असे सांगितले. या दृष्टांताचा मागोवा घेत बुटी सरकार आपले हत्ती, घोडे, नोकरचाकर यांच्या लवाजम्यासह शोध घेत घेत गंगापूर गावात आले. गंगापूर येथील ग्रामस्थांकडे खाणाखुणांच्या आधारे चौकशी केली.

बुटी सरकार यांना वाटले की, दृष्टांताप्रमाणे गंगापूर गावात भगवान सोमेश्वराचे स्थान असावे. गंगापूर गावात त्यांनी बराच शोध घेतला. मात्र, त्यांना अपयश आले. चार दिवस शोध घेऊनही भगवान सोमेश्वरांचा शोध लागत नसल्याने बुटी सरकार चिंताग्रस्त झाले. हे पाहून भगवान सोमेश्वरांनी बुटी सरकारला पुन्हा दृष्टांत देत नदीच्या काठी खोदण्यास सांगितले. त्यानुसार बुटी सरकार यांनी नदीच्या काठी खाणाखुणांच्या आधारे शोध घेतला. टिकाव, कुदळ, फावड्याने जिथे आज भगवान सोमेश्वर विराजमान आहेत त्याठिकाणी खणायला सुरुवात केली. काही वेळात कुदळीचा घाव बसताच जमिनीतून रक्त आणि पाणी यायला सुरुवात झाली. यामुळे बुटी सरकार घाबरले. त्यानंतर काळजीपूर्वक माती बाजूला केली असता साक्षात सोमेश्वर प्रगट झाले. याच ठिकाणी गर्भगृहाची स्थापना करुन मंदिर बांधण्याचे ठरले. यावेळी गंगापूर गावातील ग्रामस्थांनीदेखील आपापल्या परीने मदत केली. शिवभक्तांच्या श्रमातून मंदिर उभे राहिले, अशी आख्यायिका आहे.

- Advertisement -

1950 साली किसनलाल महाराज त्रस्त होऊन सोमेश्वर याठिकाणी आले. शिवभक्त असल्याने त्यांनी सोमेश्वराची पुजा करण्यास सुरुवात केली. त्यांची भक्ती बघून गंगापूर येथील ग्रामस्थांनी त्यांची पुजारी म्हणून नेमणूक केली. किसनलाल महाराजांनी मुंबईचे शोरेवाला, खेतान, अग्रवाल, अडोकिया या व्यापार्‍यांच्या मदतीने सोमेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार केला. मंदिर परिसरात विष्णु मंदिर, रामजानकी मंदिर, हनुमान मंदिर, नदीकाठावरील आेंकारेश्वर मंदिर बांधले. त्यांना गंगापूर गावातील ग्रामस्था मुरलीधर पाटील, बळपंत पाटील, धोंडू पाटील व इतर भाविकांनी मदत केली. शिवभक्तांची गर्दी आणि मंदिराचा वाढता व्याप बघता 1973 साली पंच म्हणून श्री सोमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली.

1987 सालापर्यंत किसनलाल महाराज जैन यांनी भगवान सोमेश्वरांची सेवा केली. 25 ऑगस्ट 1987 साली परमपूज्य किसनलाल महाराज जैन निर्वतल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली त्यांचे गुरु गिरीजागिरी महाराज यांच्या समाधीस्थळाजवळ त्यांची समाधी बांधण्यात आली. श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी, महाशिवरात्रीस सोमेश्वर येथे उत्सव साजरा करण्यात येतो. श्रावणमासात दर सोमवारी 1 लाख भाविक भक्त भगवान सोमेश्वराचे दर्शन घेतात. सोमेश्वर मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर शांत आणि सुंदर गोदाकाठ, निसर्गरम्य परिसर, भक्तीमय वातावरणाचा अनुभव भाविकांना येतो. संपूर्ण भारतातून शिवभक्त सोमेश्वर येथे येतात. भगवान सोमेश्वराचे दर्शन घेऊन कृतार्थ होतात.

- Advertisement -

श्री सोमेश्वर मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून भक्तांसाठी बोटक्लब, लहान मुलांसाठी मिनी ट्रेन, लहान मुलांसाठी झोके अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरातच ट्रस्टचे ऑफिस असून येथे देणग्या स्वीकारल्या जातात. जीवनात येणारी विघ्ने, अडथळे दूर व्हावीत यासाठी भाविक भक्त याठिकाणी शांती पूजा, श्रीसत्यनारायण पूजा करतात. ट्रस्टच्या सहकार्याने येथे लग्नसमारंभही आयोजित केले जातात. शनिवार, रविवार, शासकीय सुटीच्या दिवशी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.

सोमेश्वर मंदिर परिसरात सुमारे दीडशे वर्षाचे पिंपळ, वड, अडीचशे वर्षांचे कडुलिंबाचे झाड आहे. मंदिराच्या ताब्यात 16 एकर जमीन आहे. श्रावणमासाच्या सरींनी परिसर न्हाऊन निघाल्याने भगवान सोमेश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव भाविका भक्तांना येतो. सोमेश्वर मंदिर परिसरात आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून गोदादर्शन खुल्या रंगमचाची उभारणी करण्यात आली आहे. येथे बसून भाविक गोदामाईचे सौंदर्य दिलखुलासपणे न्याहाळू शकतात. मंदिर परिसरातील फुलांची, प्रसादाची मंदिरे भक्तीभाव वाढवितात. सोमेश्वर परिसरात पेरुच्या बागा असल्याने येथील पेरू प्रसिध्द आहेत. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पेरुची विक्री केली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -