Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राज्य कौशल्य स्पर्धेत १३२ तरुणांची चमकदार कामगिरी, रोख पुरस्काराने गौरवण्यात येणार

राज्य कौशल्य स्पर्धेत १३२ तरुणांची चमकदार कामगिरी, रोख पुरस्काराने गौरवण्यात येणार

ऑलिंपिकच्या धर्तीवर सरकारकडून रोख पुरस्कार देऊन गौरव करणार

Related Story

- Advertisement -

शांघाय येथे पुढील वर्षी होणार्‍या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेत सहभागी २६३ तरुणांपैकी १३२ तरुणांना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकाद्वारे रविवारी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सुवर्णपदक विजेत्यासाठी १० हजार रुपये, रजत पदक विजेत्यासाठी सात हजार रुपये तर कांस्य पदक विजेत्यासाठी पाच हजार रुपये पुरस्कार रक्कमही देण्यात आली.

शांघाय स्पर्धेत पदक मिळवणार्‍या युवक-युवतींना ऑलिंपिक स्पर्धांच्या धर्तीवर सरकारमार्फत रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी स्पर्धकांची तयारी कौशल्य विकास विभागामार्फत करून घेण्यात येईल. त्यांना सरकारमार्फत संपूर्ण पाठबळ देण्यात येईल, असे नवाब मलिक म्हणाले. महाराष्ट्रातील युवक-युवतीमध्ये टॅलेंट आहे. कौशल्यातील टॅलेंट शोधण्यासाठी आयटीआयबरोबरच विविध उद्योग, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालय आदी ठिकाणी शोध घेऊन टॅलेंट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बांधकाम क्षेत्रात चमकदार कामगिरी दाखविणार्‍या दोन विद्यार्थ्यांच्या स्पॉन्सरशिप जबाबदारी बोमन रुस्तम इराणी यांनी स्वीकारल्याचे यावेळी जाहीर केले.

- Advertisement -

राज्यस्तरीय स्पर्धेनंतर गांधीनगरमध्ये झोनल तर बंगळुरू येथील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढील वर्षी शांघायमध्ये होणार्‍या जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील. परळ येथील आयएसएमई स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड इंटरप्रेनर्शिप येथे झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, रुस्तमजी ग्रुपचे अध्यक्ष बोमन इराणी, डॉ. इंदू सहानी, वर्ल्ड स्किलचे कंट्री हेड प्रकाश शर्मा, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सीनियर हेड जयकांत सिंह आदी उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी थ्रीडी डिजिटल गेम आर्ट, ऑटो बॉडी रिपेअर, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी, ब्युटी थेरपी, कारपेंटिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सीएनसी मिलींग, काँक्रीट कंस्ट्रक्शन वर्क, कुकिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन टेक्नॉलॉजी, हेअर ड्रेसिंग, होटेल रिसेप्शन, हेल्थ अँड सोशल केअर अशा विविध क्षेत्रातील कल्पक अशा कौशल्यांचे सादरीकरण केले.

- Advertisement -