घरमहाराष्ट्रSSC Result 2023 : दहावी परीक्षेतील यशवंत, गुणवंताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून...

SSC Result 2023 : दहावी परीक्षेतील यशवंत, गुणवंताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

Subscribe

मुंबई : दहावीच्या परीक्षेतील यशानंतर करिअर निवडीसाठी अनेक मार्ग दिसू लागतात. या मार्गावरून पुढे जाण्यासाठी, आवडते क्षेत्र निवडण्यासाठी आणि त्यात यशस्वी होण्यासाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहावीच्या परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या वर्षी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल हा 93.83 टक्के लागला आहे.

- Advertisement -

दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 41 हजार 666 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 29 हजार 096 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 60.90 अशी असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

शालेय जीवनात दहावीची परीक्षा एक महत्वाचा टप्पा समजला जातो. हा टप्पा यशस्वीपणे पार केल्याबद्दल, यशवंत, गुणवंतांचे मनापासून अभिनंदन. आपल्या या यशासाठी मार्गदर्शन करणारे गुरूजन, पाठबळ देणारे कुटुंबीय या सर्वांचेही अभिनंदन, असे शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. या परीक्षेतील यशानंतर आपल्याला करिअरचे वेगवेगळे मार्ग खूणावू लागतात. हे मार्ग चोखंदळपणे, डोळसपणे निवडल्यास पुढे यश तुमचेच असेल. असे आवडते क्षेत्र निवडण्यासाठी, त्यात यश मिळावे यासाठी देखील मनापासून शुभेच्छा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

काहीजणांना या परीक्षेतील यशाने हुलकावणी दिली असेल तर, त्यांनी खचून न जाता नव्याने तयारी करावी. त्यासाठी फेरपरीक्षेचा पर्याय उपलब्ध आहे, त्याचा अवलंब करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत – केसरकर
दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दांत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. तर उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी ना उमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावे, असे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -