घरमहाराष्ट्रST लवकरच सुरू करणार माल वाहतूक

ST लवकरच सुरू करणार माल वाहतूक

Subscribe

आता एसटी देखील माल वाहतुकीच्या व्यवसायात उतरणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबती माहिती दिली आहे.

एसटी महामंडळ आता माल वाहतूक सेवा सुरु करणार असून गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविणे आणि लोकांना विविध सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करुन देणे हा यामागील उद्देश असल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले. स्वतंत्र वाहनांद्वारे माल वाहतूक करणे, विनावापर पडून असलेल्या जागांवर ३०१ गोदामांची निर्मिती करणे आदींबाबत आज ( गुरूवारी ) सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सादरीकरण करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार एसटीची माल वाहतूक आणि गोदामांची सेवा लवकरच सुरु करण्यात येईल, असे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले.

महामंडळाने प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या माल वाहतुकीच्या तरतुदीचा आता वापर करण्याचा निर्णय दिवाकर रावते यांनी घेतला आहे. त्याआधारे रेल्वे माल वाहतुकीच्या धर्तीवर आता एसटीचीही माल वाहतूक सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. माल वाहतुकीमुळे रेल्वे मोठ्या प्रमाणात फायद्यात आहे.

- Advertisement -

माल वाहतूक सेवेसाठी स्वतंत्र वाहने वापरण्यात येणार आहेत. सध्याच्या वापरातील प्रवासी वाहनांचे ९ वर्षानंतर सर्व तांत्रिक बाबी पडताळून माल वाहतूक वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येईल. त्यास परिवहन विभागाची रितसर मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर ही वाहने माल वाहतुकीसाठी वापरण्यात येतील. कृषी माल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, व्यापारी माल, स्टेशनरी आदी सर्व प्रकारच्या मान्यता प्राप्त मालाची वाहतूक करण्यात येईल. विशेष करुन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल शहरी बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याच्या कामी या सेवेचा वापर करण्यात येईल. अशी माहिती दिवाकर रावते यांनी दिली.

महामंडळाच्या माल वाहतूक सेवेत रेशन धान्य, पोषण आहाराचे धान्य आदींची वाहतूक करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी महामंडळाच्या साधारण ३ हजार जुन्या प्रवासी बसेसचे माल वाहतूक वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येईल. काही नवीन माल वाहतूक वाहने खरेदी करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.

- Advertisement -

आज झालेल्या सादरीकरणात राज्यातील ३०१ ठिकाणी गोदामे बांधता येऊ शकतील असे सांगण्यात आले. ३ टप्प्यांमध्ये या गोदामांची बांधणी करुन ती लोकांसाठी आणि विशेषत: शेतकऱ्यांच्या मालाच्या साठवणुकीसाठी उपलब्ध करुन देण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे. माल वाहतूक आणि गोदामे यांचे संनियंत्रण करण्यासाठी महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक हे नवीन पद निर्माण करण्यात येणार असून स्वतंत्र विभाग आणि स्वतंत्र कर्मचारी वर्गही नियुक्त करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -