घरताज्या घडामोडीकरोनामुळे चित्रपटगृह, नाट्यगृह, जिम बंद; पुणे-पिंपरीत शाळाही बंद!

करोनामुळे चित्रपटगृह, नाट्यगृह, जिम बंद; पुणे-पिंपरीत शाळाही बंद!

Subscribe

करोनाचा फैलाव राज्यात रोखण्यासाठी राज्य सरकारकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढल्यामुळे काळजीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्याशिवाय, राज्य सरकारने लोकांना, खासगी कंपन्यांना काही आवाहन देखील केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची माहिती आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्यात, सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पुढचा आदेश येईपर्यंत म्हणजे किमान ३० मार्चपर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरांमधले नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, चित्रपट गृह बंद ठेवण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ‘चीनमध्ये देखील वुहानमध्ये त्यांनी सगळं बंद ठेवल्यामुळे तिथे करोनाचा फैलाव नियंत्रित झाला आहे, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

राज्यात आत्तापर्यंत १७ रुग्ण

‘आत्तापर्यंत महाराष्ट्रात १७ रुग्ण आढळले आहेत. या सगळ्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलं आहे. कस्तुरबा हॉस्पिटलला ४, नायडूमध्ये १० आणि नागपूरमध्ये ३ आहेत. यातले एकूण १५ लोकं बाहेरून प्रवास करून आले होते. याशिवाय सगळी जिल्हा रुग्णालयं, शासकीय-वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणीही हे आयसोलेशन वॉर्ड तयार झाले आहेत’, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘ज्या व्यक्तीने १५ फेब्रुवारीनंतर केंद्र सरकारने यादी दिलेल्या ७ देशांमध्ये प्रवास केला असेल आणि जे संध्याकाळी ५.३० नंतर भारतात येतील, त्यांना क्वॉरंटाईन (स्थानबद्ध) केलं जाईल. चीन, द. कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इराण या ७ देशांचा त्यात समावेश आहे. आम्ही केंद्राला सांगितलं आहे की आमच्या राज्यात सापडलेले रुग्ण दुबई आणि अमेरिकेतून आले आहेत. त्यांचा अंतर्भाव या यादीत करण्याची विनंती केंद्राला केली आहे’, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

जनतेला मुख्यमंत्र्यांचं आवाहन

‘असं मानलं जातं की उपचारापेक्षा काळजी घेणं जास्त चांगलं आहे. त्यासाठी राज्य सरकार नोटिफिकेशन काढत आहे. बस, रेल्वेसारख्या अत्यावश्यक सेवा बंद करता येणार नाहीत. पण आमचं आवाहन जनतेला आहे की गर्दी टाळा, वेळोवेळी हात साबणाने धुवा, हस्तांदोलनाऐवजी दुरून नमस्कार करा’, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.

‘वर्क फ्रॉम होम करा’

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासगी कंपन्यांना शक्य तिथे वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याची परवानगी कर्मचाऱ्यांना देण्याचं आवाहन केलं आहे. ‘राज्य शासन सर्व कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना आवाहन करतंय की कोणत्याही प्रकारे गर्दी करणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. याआधी मिळालेली परवानगी रद्द करण्यात येईल. खासदी क्षेत्रातल्या कंपन्यांना आवाहन आहे की जिथे शक्य आहे, तिथे कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी देण्यात यावी’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

परीक्षा आणि शाळांचं काय?

यावेळी शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी यावेळी जारी केले आहेत. यामध्ये, ‘पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये १०वी आणि १२वीच्या परीक्षा चालू राहतील. पण पुढील आदेश येईपर्यंत तिथे शाळा आणि महाविद्यालयं बंद राहतील. शिवाय, १ली ते ९वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात येत्या काही दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल’, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

तारापोरवाला मत्स्यालय प्रेक्षकांसाठी बंद

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपायांतर्गत तारापोरवाला मत्स्यालय प्रेक्षकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. तरी तारापोरवाला मत्स्यालय प्रेक्षकांसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील, असे आयुक्त मत्स्यव्यवसाय (मुंबई) यांनी कळविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -