घरताज्या घडामोडीशिक्षक बनण्या ऐवजी उघडले पोल्ट्री फार्म

शिक्षक बनण्या ऐवजी उघडले पोल्ट्री फार्म

Subscribe

राजापूर तालुक्यातील ( जिल्हा रत्नागिरी) खरवते फाटा येथील कोंडवाडी गावात ‘गांगो’ ( संतोष भिकणे ) ने गावातील शिक्षकांचा आदर्श घेऊन ग्रॅज्युएशन व डीएड केले. मात्र खडू, फळा व छडी हातात घेऊन शिक्षक बनून देशाचे भविष्य असलेले विद्यार्थी घडविण्याची स्वप्ने बघणाऱ्या ‘गांगो’चे कोरोना महामारीमुळे चालू वर्तमान बिघडले आणि स्वप्नातील ‘भविष्य’बिघडले. शिक्षकाची नोकरी न मिळाल्याने नवी मुंबईत एका कंपनीत कमी पगारात नोकरीला लागला. मात्र कोरोना, लॉकडाऊनमुळे दोन वर्षातच नोकरी गेली आणि घरी बसावे लागले. स्वतःच्या पोटासाठी आणि त्याच्यावर विसंबून असलेल्या आजीसाठी नियतीने त्याला पुन्हा गावात आणले आणि राहत्या घराच्या ठिकाणी किराणा मालाचे व चिकनचे दुकान टाकायला भाग पाडले. मात्र हिम्मतवान ‘ गांगो’ ला आता अथक मेहनतीमुळे कधीकधी किराणा मालापेक्षा कोंबड्यांच्या मानेवर सुरा फिरवून व चिकन विक्री करून बऱ्यापैकी कमाई मिळते आहे. कटू अनुभवानंतर म्हणतात ना, गड्या आपला गावच बरा !

कोरोनाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. मार्च २०२० पासून संपूर्ण भारतात कोरोनाने शिरकाव केला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन केले. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता जवळजवळ सर्वच प्रकारचे व्यवहार, कामकाज, उद्योगधंदे हे ठप्प झाले. त्याचा भीषण परिणाम म्हणजे देशातील लहान- मोठ्या लाखो कंपन्या बंद पडल्या. तर अनेक कंपन्यांनी स्टाफ कमी केला. त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले आणि ते बेरोजगार झाले. अशाच बेरोजगार लोकांपैकी एक रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील खरवते फाटा , कोंडवाडीत राहणारा ‘गांगो’ म्हणजे संतोष भिकणे (३१) हा आहे.

- Advertisement -

‘गांगो’चा जन्म कोंडवाडीमधीलच आहे. वडील महादेव तुकाराम भिकणे हे शेतकरी होते. १२ वर्षांचा असताना त्याची आई देवाघरी गेली. तर दोन वर्षांपूर्वीच डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. ‘गांगो’ने खूप मेहनत घेऊन प्राथमिक शिक्षण घेतले. चांगली नोकरी मिळावी यासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण केले. गावात काहीजण शिक्षक असल्याने त्यालाही लहानपणापासून शिक्षक व्हावे असे वाटले आणि त्याने डीएड ही केले. ‘गांगो’ला दोन सख्खे भाऊ ( विवाहित) आहेत. त्यापैकी एकजण ठाणे लगतच्या दिवा येथे त्याच्या कुटुंबासह राहतो. तर दुसरा भाऊ त्याच्या गावातच कुटुंबासह राहतो. मात्र ‘गांगो’ त्याच्या म्हाताऱ्या आजीसोबत गावातच राहत आहे.

‘ गांगो’ने शिक्षक पेशाची नोकरी मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न केले मात्र त्याला शिक्षक काही होता आले नाही. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी त्याला नवी मुंबई येथील मोटार पार्ट इम्पोर्ट – एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीत जॉब लागला होता. त्यामुळे तो दिवा येथील भावाकडे राहून कामाला नवी मुंबईला जात असे. दरमहा त्याला १३ -१४ हजार पगार मिळत होता. तो गावी ये – जा करून आपल्या म्हाताऱ्या आजीची काळजी घेत असे.

- Advertisement -

मात्र मार्च २०२० पासून भारतात घुसखोरी केलेल्या कोरोना व त्याला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने लावलेल्या लॉकडाऊनने त्याचे करिअर ‘डाऊन’ केले. मंदीचा मोठा आर्थिक फटका बसल्याने कंपनीने त्याला कामावरून काढून घरी बसवले. मात्र परिस्थितीने बेजार झालेल्या ‘गांगो’ ने हार मानली नाही. नोकरी गेल्याने तो निराश जरूर झाला. आता घरी असलेल्या म्हाताऱ्या आजीचा सांभाळ कसा करावा यांची गहन चिंता त्याला भेडसावत होती. दोन वर्षे नोकरी करून जे काही थोडेफार पैसे जमा केले होते ते वर्षभर घरातच बसून राहिला. आतापर्यंत कमावलेले सर्व पैसे संपत आल्यामुळे त्याने या निराशाजनक परिस्थितीवर मात करण्याचा निश्चय केला.

दरम्यान, बंद पडलेल्या कंपनीत पुन्हा काम मिळावे यासाठी ‘गांगो’ ने कामाबाबत मोठ्या आशेने वारंवार चौकशीसुद्धा केली मात्र त्याच्या पदरी पडली ती फक्त आणि फक्त निराशा. दुसरी चांगली नोकरी मिळविण्यासाठी तो त्याचे वर्गमित्र गणेश कानागल इतर मित्र यांच्याशी सुसंवाद करीत असे. तसेच, त्याला त्याच्या गावातील गुरुजन सुभाष जोशी गुरुजी, सीताराम कोसंबे गुरुजी, संतोष जोशी, देवदास कोसंबे, सुनील चौगुले, दीपक भिकणे, किशोर चौगुले आदींनी पर्यायी नोकरी मिळेपर्यंत पोट भरण्यासाठी गावातच काहीतरी व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा दिली.

वास्तविक, कोंडवाडी गाव हे आडबाजूला आणि दूर अंतरावर असल्याने थोडं खेडेगावात मोडते. इथे चंदू चौगुले यांचे एकच छोटंसं दुकान आहे. त्यात ते थोडफार सामान भरतात. मात्र मिरचीमसाला, टोमॅटो, बटाटे संपले तर ते आणायला थोड्या दूर अंतरावरील गावठाणमधील एक छोटेशा टपरीवजा दुकानामधून घ्यावे लागते. परंतु तेथेही माल संपला की दीडशे रुपये रिटर्न भाडे रिक्षा चालकाला देऊन थेट ओणी, लांजा किंवा राजापूर मार्केटमधूनच सामान आणावे लागते.
त्यामुळे मित्र परिवार, गुरुजनांच्या उपदेशानुसार, ‘गांगो’ने गावातच त्याच्या छोट्याशा जागेत किराणा मालाचे आणि एका बाजूला चिकन विक्रीचे एक दुकान टाकले.

आता एक वर्षापेक्षाही जास्त कालावधी लोटला आहे. आता ‘गांगो’चे किराणा मालाचे दुकान मात्र व्यवस्थित सुरू आहे. त्याला कोरोनाच्या कालावधीत कोरोनाचे नियम पाळून पोटापूरता चार पैसे जरूर मिळतात.
‘गांगो’च्या दुकानात किराणा माल, भाजीची व बुधवार, शुक्रवार आणि रविवारी ‘चिकन’ ची सुद्धा जवळच व्यवस्था झाल्याने म्हणजे ‘व्हेज – नॉन व्हेज’ गावकरीही खुश आणि आता दुकानदारी चांगली सुरू असल्याने भिकणेंचा बेरोजगार ‘गांगो’ म्हणजे ‘संतोष’ खऱ्या अर्थाने ‘संतुष्ट’ झाला आहे.

त्यामुळे एवढ्या कटू अनुभवानंतर, काही खस्ता खाल्ल्यानंतर आणि दुकानदारीमुळे थोडी कमाई चांगली होऊ लागल्यानंतर ‘गांगो’ने आता पुन्हा नोकरीकडे न वळण्याचा आणि गावतच राहून दुकानदारी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात देशवासियांना आत्मनिर्भर बना असे सांगते. तर ‘गांगो’ची मन की बात म्हणते, खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर व्हायचे असेल तर ‘गड्या आपला गावचं बरा’.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -