तुकाराम सुपेकडून पुन्हा मिळाले ५८ लाखांचे घबाड

TET exam scam 58 lakh confiscated from Tukaram Supe
TET exam scam 58 lakh confiscated from Tukaram Supe

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याच्या कार्यालयातून आणखी एक मोठे घबाड पुणे पोलिसांच्या हाती लागले आहे. पुणे पोलिसांनी सुपेच्या कार्यालयातून २४ तासांत ५० लाखांपेक्षा अधिकची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. याच प्रकरणात तुकाराम सुपे यांच्या परिचिताकडून काल रात्री २५ लाख रुपये पुणे पोलिसांनी जप्त केले होते. यानंतर पुन्हा पुणे पोलिसांनी ३३ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.

गेल्या २४ तासांत तुकाराम सुपेकडून पुणे पोलिसांनी ५८ लाख रुपये जप्त केले आहेत. यापूर्वी १ कोटी ५८ लाख आणि ९० लाखांचे दागिने सुपे आणि त्याच्या नातेवाईकांकडून जप्त करण्यात आलेत. त्यामुळे तुकाराम सुपेकडून आतापर्यंत ३ कोटी ८७ लाख रुपये आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेची आणखी कसून चौकशी केली त्यावेळी या प्रकरणात तुकाराम सुपेची मुलगी कोमल पाटील आणि जावई नितीन पाटील यांनी देखील मदत केल्याचे समोर आले होते. यावेळी या दोघांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले. या चौकशीनंतर पुणे पोलिसांनी त्यांच्याकडून १ कोटी ५८ लाखांची रोकड आणि ७० लाखांचे सोने जप्त केले आहे.

तुकाराम सुपेला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी घरात छापेमारी करत ८८ लाख ४९ हजार ९८० रोख, पाच ग्रॅम सोन्याचे नाणे, ५ लाख ५० हजार रुपयांची एफडी केल्याची कागदपत्रे हस्तगत केली. तसेच सुपेने त्याच्या मित्रालाही लाखो रुपये दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी जी.ए सॉफ्टवेअर कंपनीच्या दोन कर्मचार्‍यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेय. या दोघांची सायबर शाखेत चौकशी सुरू आहे.