नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सज्जता, ठाण्यात २ एनडीआरएफच्या तुकड्या दाखल

पावसाळ्यात (Rainy Season) उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा (Natural disasters) सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ठाणे जिल्ह्याला (Thane) एनडीआरएफच्या (NDRF) दोन तुकड्या मिळाल्या आहेत. एसडीआरएफच्या माध्यमातून पाच तहसील कार्यालयांना प्रत्येकी एक याप्रमाणे ५ यांत्रिक बोटी देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व महानगरपालिका (TMC), नगरपालिका, तहसील कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाविषयी सखोल आढावा घेण्यात आला आहे. पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी तयारी सुरू केली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्याला यंदा एनडीआरएफच्या दोन तुकड्या देण्यात आल्या असून त्यातील एक ठाण्यात आणि दुसरी कल्याण येथे ठेवण्यात येतील, असे नार्वेकर यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफकडून पाच यांत्रिकी बोटी मिळाल्या आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि तहसील कार्यालये अशा एकूण ६९ बोटी उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यामध्ये ठाणे महापालिकेकडे २१ बोटी असून नवी मुंबई महापालिका १० बोटी, कल्याण डोंबिवली महापालिका ५ बोटी, उल्हासनगर महापालिका १० बोटी, मिराभाईंदर महापालिका ४ बोटी, भिवंडी निमाजपूर महापालिका ५ बोटी, अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांच्याकडे अनुक्रमे २ आणि ७ बोटी तर अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड तहसील कार्यालयात प्रत्येकी एक बोट उपलब्ध आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

विविध विभाग, महापालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीए, मेट्रो यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेऊन पावसाळ्यात या कामांमुळे वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकांनी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना नोटीस दिल्या आहेत त्यातील रहिवाशांनी इमारत रिक्त करून स्थलांतरासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

धरणातील पाणी साठ्याबाबत अपडेट करतानाच धरणातून विसर्ग सोडण्यापूर्वी जिल्हा यंत्रणेला जलसंपदा विभागाने दोन दिवस आधी कल्पना द्यावी. जेणेकरून नदीकाठावरील गावांमधील नागरिकांना सतर्क करून त्यांचे स्थलांतर करणे सोईचे होईल, असे नार्वेकर यांनी सांगितले. यासोबतच आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाला पुरेसा औषधसाठा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे जिल्हयात ३२ महसूल मंडळस्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे ३२ पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहेत. कृषी विभागामार्फत ३२ स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र तर जिल्हयातील महानगरपालिका स्तरावर ३९ पर्जन्यमापक यंत्रे कार्यरत आहेत.


हेही वाचा : परीक्षेच्या काळात काही हितशत्रूंनी संभ्रम निर्माण करण्याच प्रयत्न केला, पण… – वर्षा गायकवाड