घरमहाराष्ट्र'धनुष्यबाण' कोणाकडे? निवडणूक आयोगाकडून 14 ऑक्टोबरपर्यंत निर्णय अपेक्षित

‘धनुष्यबाण’ कोणाकडे? निवडणूक आयोगाकडून 14 ऑक्टोबरपर्यंत निर्णय अपेक्षित

Subscribe

मुंबई : विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. आता खरी शिवसेना कोणाची आणि ‘धनुष्यबाण’ कोणाचे, हा वाद निर्माण झाला आहे. सध्या हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. येत्या 3 नोव्हेंबर 2022 रोजी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे आठवडाभरात शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे.

शिवसेनेच्या चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला होता. त्याला आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. 27 सप्टेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा आयोगाकडेच आले आहे. शिवसेनेने संबंधित कागदपत्रे निवडणूक आयोगापुढे सादर करण्यासाठी 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनाच नव्हे तर पक्षप्रमुखपदावर देखील दावेदारी सांगितली आहे. यासंदर्भात शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिंदे गटाच्या वतीने 40 आमदार आणि 12 खासदारांसह लाखो प्राथमिक सदस्यांचा उल्लेख करत निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाची मागणी करण्याबरोबरच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होण्याची तक्रारही शिंदे गटाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 14 ऑक्टोबर 2022 ही शेवटची तारीख असून 15 ऑक्टोबर 2022 रोजी अर्जांची छाननी होईल. 17 ऑक्टोबर 2022पर्यंत अर्ज मागे घेता येईल. तर, 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. त्यामुळे येत्या 14 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक चिन्हाबाबतचा फैसला केंद्रीय निवडणूक आयोग घेईल, अशी शक्यता आहे. आता धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांपैकी कोणाला देण्यात येईल? की गोठवले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -