घरमहाराष्ट्र‘वर्षा’वर रवींद्र वायकरांचे तांडव!

‘वर्षा’वर रवींद्र वायकरांचे तांडव!

Subscribe

मेहतांसह परब, प्रभू,शिंदेंची पंखछाटणी!

मुख्यमंत्री कार्यालयातील समन्वयकपदाच्या नियुक्तीचे पत्र, दालन, सुरक्षा व्यवस्था यासह मिळावे म्हणून आमदार आणि ‘मातोश्री’चे निकटवर्तीय रवींद्र वायकर यांनी रविवारी वर्षावर ‘तांडव’ केले. या तांडवनृत्याचा शंखनाद त्यांनी माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्यासमोर त्यांच्याच नावाने केला. इतकेच नव्हे तर मेहतांच्याच दालनावर वायकरांची ‘नजर’ पडली आहे. त्यामुळे आता तरी माजी राज्यमंत्री असलेले वायकर समन्वयक होणार की प्रतिष्ठापनेआधीच त्यांच्या पदाचे विसर्जन होणार याची चर्चा शिवसेनेत जोरात सुरू आहे. दुसर्‍या बाजूला अजोय मेहता, अनिल परब, सुनील प्रभू आणि एकनाथ शिंदे यांचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी त्यांची पद्धतशीर पंखछाटणी करण्यात येणार आहे.

रवींद्र वायकर यांच्यापेक्षा कित्येक पटीने शक्तिशाली आणि चाणाक्ष असणार्‍या मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशींनी मेहतांबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोरच जाहीर भांडण केले होते. त्यानंतर त्यांना आधी आयुक्तपद आणि नंतर राज्य सरकारच्या मंत्रालयामधील प्रतिष्ठित जबाबदारीतून बाजूला केले गेले. त्यासाठी मेहतांनी अशी चक्रं फिरवली की परदेशींना थेट संयुक्त राष्ट्रसंघाचा रस्ता धरावा लागला. अजोय मेहता यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, शरद पवार, गोपीनाथ मुंडे अशा दिग्गजांसोबत काम केल्याने त्यांचा एक वेगळा धाक आहे. खासदार अरविंद सावंत आणि रवींद्र वायकर यांच्या पदांबद्दल लाभाच्या पदाचा मुद्दा उपस्थित करून भाजपने न्यायालयात जायची तयारी केली होती.

- Advertisement -

त्यामुळे सावंत-वायकरांना आपापली पदे सोडावी लागली. या दोन्ही नेत्यांनी ही पदे सोडली नसती तर मुख्यमंत्री ठाकरे राजकीय अडचणीत येणार हे निश्चित होते. त्यामुळे स्वत: उद्घव ठाकरे, तत्कालीन मुख्य सचिव अजोय मेहता, विधी मंत्रालयाचे सचिव, मुख्यमंत्री कार्यालयातील ज्येष्ठ सनदी अधिकारी यांनी या दोन्ही नेत्यांना राजीनामा पत्रावर सह्या करण्यासाठी विनंती केली. मात्र ते वेगवेगळी कारणे देत डाळ शिजू देत नव्हते. तेव्हा एका ज्येष्ठ सनदी अधिकार्‍याने याची गंभीरता मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर शेवटच्या क्षणी ही जबाबदारी दोन सनदी अधिकार्‍यांच्या समक्ष उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी सोपवली.

दुसर्‍या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे मुंबईबाहेर दौर्‍यावर जाणार होते, त्यामुळे त्याच रात्री उशिरापर्यंत सह्या होणे गरजेचे होते. हा अधिकारी म्हणाला, नार्वेकर यांनाही या नेत्यांकडून गोल गोल उत्तरेच पहिल्या प्रयत्नात मिळाली. तेव्हा आमची चिंता वाढली. कारण तोपर्यंत मंत्रालायतील कार्यालय बंद होण्याची वेळ झाली होती. मिलींद नार्वेकरांनी या दोन्ही अधिकार्‍यांना सांगितले की, रात्री झोपण्यापूर्वी एकदा फोनवर बोलू. तोपर्यंत राजीनामा पत्रे जमा होतीलच. काळजी करू नका, आणि नेमके तसेच झाले. राजीनामा पत्रांवर सह्या होऊन ती कार्यालयात पोहोचली आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा पत्रे पोहचल्याचा निरोपही देण्यात आला.

- Advertisement -

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे शिवसेनेच्या आमदारांशी संवाद साधला तेव्हा रवींद्र वायकर यांना लवकरच समन्वयकाची जबाबदारी देण्यात येईल, असे भाषनातून सूतोवाच केले. त्यानंतर वायकर यांनी ते आजोबा झाल्याप्रित्यर्थ ‘वर्षा’वर मिठाई वाटली. लगेचच वायकर यांनी आपल्याला नव्या नियुक्तीचे पत्र कधी मिळणार याची मुख्यमंत्री ठाकरे यांना जाहीर विचारणा केली. आपल्याला तीन स्वीय सहायकांसह दालन सहाव्या मजल्यावरच हवे, आपल्याला गाडी, राजशिष्टाचार आणि सुरक्षा काय असणार? अशा अडचणीच्या प्रश्नांचा भडीमार जोगेश्वरीच्या आमदारांनी केला.

त्यावेळी तिथे शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर, विश्वनाथ नेरुरकर, अ‍ॅड. अनिल परब, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह प्रधान सल्लागार अजोय मेहता हेदेखील उपस्थित होते. आपल्याला सातव्या मजल्यावर दालन नको तर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या शेजारीच दालन मिळायला हवे, असा हट्ट वायकरांनी वर्षावरच सुरू केला. वायकर हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटचे गेली अनेक वर्षे सदस्य असल्याचे तेच खासगीत सांगतात. रश्मी ठाकरे यांच्यासह आदित्य यांनीही सध्या वायकरांना बळ द्यायला सुरुवात केली आहे. सध्या परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब हे मुख्यमंत्र्यांचे ‘ब्ल्यू आईज बॉय’ आहेत. शांतपणे ठाकरे फॅमिलीच्या हितासाठी काम करण्यासाठी ते ओळखले जातात.

मुंबईसह राज्यातील पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून ठाकरे यांच्याकडे पोहचतात. आता ती कामगिरी वायकरांकडे जाणार आहे. विनम्र स्वभाव, अभ्यासू वृत्ती आणि सहकार्याच्या भावनेने बघणारे मुख्य प्रतोद सुनील प्रभू आमदारांमध्ये लोकप्रिय आहेत. सुनील प्रभूंच्या कार्यकक्षेला छेद देण्याचाही प्रयत्न या निवडीतून केलेला दिसतोय. तर शिवसेनेचे संकटमोचक आणि राज्यभरातील आमदारांना ‘आपला’ वाटणारे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेला धक्का देण्यासाठीच वायकरांची ही नवी घोषणा असल्याचे शिवसेनेत दबक्या आवाजात बोलले जात आहे.

वायकर यांच्या नजरेत अजोय मेहता यांचं दालन भरलं आहे. मुख्य सचिव म्हणून मेहता निवृत्त झाल्यावर ते ठाकरेंचे प्रधान सल्लागार झालेत. त्यानंतर हे सुंदर दालन मुख्यमंत्र्यांशेजारीच त्यांच्यासाठी करण्यात आले आहे. त्यामुळे वायकरांना ते दालन मिळवून देण्यासाठी ठाकरे यांच्या निकटवर्तींमधील प्रभावशाली व्यक्ती प्रयत्नशील असल्याचे खात्रीलायक रित्या समजते.

सध्या शांत, संयमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामुळे कमालीचे तणावाखाली आहेत. सतत त्यांची अ‍ॅड. अनिल परब यांच्या माध्यमातून अनेक वकिलांशी सल्लामसलत सुरू आहे. मंगळवारी याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. ठाकरे कुटुंबियांची कायदेशीर जबाबदारी चोख पार पाडणार्‍या अ‍ॅड.अनिल परब यांच्या बरोबरीने आता नव्यानेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ‘कायदेशीर’ ज्ञानाचा आधार घ्यायला मातोश्रीने सुरुवात केल्याचे समजते. आदित्य ठाकरेंसाठी अनेक जणांचे कायदेशीर ज्ञान ‘वापरणार्‍या’ ठाकरे कुटुंबियांच्या सुशांत सिंह प्रकरणात काही महत्त्वाच्या चुका झाल्याचेही ज्येष्ठ विधिज्ञांनी ‘आपलं महानगर’कडे बोलून दाखवले आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांना ‘जवळचीच’ कुणी व्यक्ती अधिक अडचणीत आणण्याची भीती शिवसेनेच्या एका नेत्याने ‘आपलं महानगर’शी बोलून दाखवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -