घरदेश-विदेशकरोनाच्या प्रसाराचा उद्योगांवर गंभीर परिणाम

करोनाच्या प्रसाराचा उद्योगांवर गंभीर परिणाम

Subscribe

देशांतर्गत उद्योगातही मरगळ

करोना संसर्ग लागणीच्या वृत्ताचा अतिरेकी प्रसार होऊ लागल्याचा देशाच्या आणि राज्यातल्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ लागला असून देशातील सर्वात मोठ्या वाहन उद्योगाला त्याची जबर झळ बसू लागली आहे. पाश्चात्य देशांकडून विशेषत: चीन सारख्या देशाकडून आपल्या देशात वाहनाच्या सुट्या भागांचा सर्वाधिक पुरवठा होतो. चीनमधून सुट्या भागांचा हा पुरवठा पुरता खंडित झाल्याने वाहन उद्योग ठप्प झाला आहे.

आता तर देशात दक्षता घेण्याच्या सूचना आल्याने देशांतर्गत उद्योगावरही त्याचे परिणाम दिसण्याची भीती वर्तवली जात आहे. करोनाचा प्रसार होण्याऐवजी माध्यमांकडून होत असलेल्या अतिरेकी प्रसाराचा हा परिणाम असून, तो देशाच्या अर्थव्यवस्थेलाच अडचणीत आणू लागल्याचे चित्र आहे. करोनाच्या वृत्ताने कालच मुंबई शेअर बाजार ४५० अंकांनी खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजारात १३० अंकांची घसरण झाली.

- Advertisement -

चीनपासून मोठ्या प्रमाणात फैलावत चाललेल्या करोना विषाणूच्या वृत्ताने भारतीय बाजाराला प्रचंड फटका बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये करोना संसर्गाविषयी भारतीय प्रसार माध्यमांनी अतिरंजित बातम्यांमुळे देश ढवळून निघाला असून, विदेशी मालावर विसंबून असलेल्या उद्योगाबरोबरच देशांतर्गत उद्योगालाही त्याचा जबर फटका बसू लागला आहे. चीन ही भारतीय बाजारातला वाहन व्यवसायातील सुट्या भागांचा सर्वाधिक पुरवठा करणारी बाजारपेठ मानली जाते. करोनाचा प्रसार होऊ लागल्यापासून सरासरी दीड महिन्यात त्या देशातून वाहनाचे सुटे भाग येणे पूर्णत: थांबले आहे.

यामुळे देशभरातील वाहन निर्मितीवर त्याचा प्रभाव झाला असून, देशातील बहुतांश वाहन प्रकल्प ठप्प झाले असल्याचे सांगितले जाते. मोबाईलच्या सुट्या भागांचा पुरवठाही चीनकडून होतो. तोही थांबला आहे. चीनमधील एकूणच मालाचा पुरवठा थांबल्याने उद्योगांपुढे नव्याने संकट उभे राहिले आहे. देशातील सर्वात मोठा रिलायन्सलाही करोनाचा फटका बसला आहे. शेअरबाजारातील घसरणीने रिलायन्सला अब्जावधी डॉलरची घसरण पाहावी लागत आहे. रिलायन्सच्या बाजार भांडवलावरही त्याचा परिणाम झाला आहे. महिंद्र, विप्रो, बिर्ला, अदानी उद्योगावरही करोना प्रसाराचा प्रभाव झाला असून, या उद्योगांची कोट्यवधींची उत्पादन निर्मिती थांबली आहे.

- Advertisement -

भारतात करोनाचे अधिकृत तीन रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर उपचार केल्यावर त्यांच्यातील संसर्ग लोप पावला. तरीही प्रशासनाने देशातील २१ विमानतळांवर येणार्‍या प्रवाशांच्या तपासार्थ विशेष कक्ष सुरू केले आहेत. प्रवाशांची सक्तीने तपासणी केली जात आहे. दिल्लीत दक्षता म्हणून ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात करोनाचे रुग्ण नसल्याचे केंद्र सरकारकडून अधिकृत जाहीर करण्यात येत असले तरी माध्यमांकडून भीती पसरवली जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या भीतीमुळेच भारतातील उद्योगावर त्याचा परिणाम जाणवू लागल्याचे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -