घरमहाराष्ट्ररायगड किल्ला परिसरातील नैसर्गिक संपत्ती धोक्यात

रायगड किल्ला परिसरातील नैसर्गिक संपत्ती धोक्यात

Subscribe

रायगड किल्ला व परिसर हा नैसर्गिक समृद्धीने नटलेला परिसर आहे. या भागात अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती व पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. आज रायगड किल्ला संवर्धनातून कोट्यवधी रुपये खर्चून केवळ भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, पर्यावरणाचा विचार करता रायगड परिसरातील नैसर्गिक वनस्पती व पशुपक्ष्यांच्याही संवर्धनाबाबत विचार होत नसल्याचे दिसून येत आहे.

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेला रायगड विविध वनसंपदेने नटलेला आहे. छत्रपती शिवरायांनी असा परिसर स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला. रायगड किल्ला व परिसरातील रायगडवाडी, वाघेरी, छत्री निजामपूर, वाघोली, नेवाळी, तसेच रायगड परिक्रमा मार्ग या परिसरात 35 प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. शिवकाळात हा परिसर नैसर्गिक संपत्तीने वेढलेला होता. काळाच्या ओघात ही संपत्ती नष्ट होवू लागली आहे. या नैसर्गिक संपत्तीमध्ये औषधी वनस्पतींचादेखील समवेश आहे. यातील अनेक वनस्पती दुर्धर आजारावर गुणकारी आहेत. नाना दरवाजा, टकमक टोक पायथ्याशी असलेल्या टकमकीवाडी परिसरातही या वनस्पती आहेत. रायगड किल्ल्याचे अभ्यासक सुरेश वाडकर हे गडावर गेले अनेक वर्षे अभ्यास दौरे करीत आहेत. यात ते येथील वनसंपदा गडप्रेमींना दाखवतात, तसेच पक्ष्यांचे आवाजही काढतात. त्यांच्या अभ्यासात गडावर तब्बल 250 प्रकारचे पक्षी विहार करताना आढळले आहेत.त्यात छोटा बसंत स्वर्गीय नर्तक, नवरंग, आम्रपाली, डोमकावळा, पाकोळी, भूलचुकी, स्टरलेट मिनिवेट अशा अतिशय सुंदर पक्षांचा समावेश आहे. रायगड परिसरात फिरताना हे पक्षी आढळून येत होते.

- Advertisement -

रायगडाचा परिसर तर औषधांचे भांडार आहे. या ठिकाणी भुईआवळा, पांगारा, माकडी, निर्गुडी, रिठा, हरडा, वारस, आघाडा, रामेटा अशा औषधी वनस्पती आहेत. उवानाशक, जंतुनाशक, वेदनानाशक अशा प्रकारात त्यांचा वापर केला जात असतो. मात्र, ही वनस्पती देखील विविध प्रकल्पांच्या कामात आणि वैयक्तिक कामासाठी तोडण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत तर किल्ले रायगड परिसर बोडका करण्याचे काम सुरू आहे. अनेक धनदांडग्यांनी व्यावसायिक कारणासाठी जागा विकत घेऊन त्यावरील वनस्पती नष्ट केल्या आहेत. याबाबत प्रशासन कागदोपत्री नियम हाताळत ते क्षेत्र आपल्या कक्षेत येते की नाही हे पाहते आणि दुर्लक्ष करण्याचे काम करीत आहे. रायगड संवर्धनासाठी 600 कोटींचा आराखडा तयार केलेला आहे. यात भौतिक सुविधांवर मोठा खर्च होत आहे. पर्यावरण रक्षण व या संपदेचे संवर्धन याचा अंतर्भाव या विकासकामांमध्ये नसल्याने भविष्यात गडाच्या या संपत्तीचा विनाश होण्याची भीती निर्माण झालेली आहे.

महाडमधील अनेक संस्थांनी रायगड परिसर वनक्षेत्र म्हणून राखीव करण्याची मागणीही केलेली होती. पण त्यावर फारसा विचार झालेला दिसत नाही. गड संवर्धनानंतर वाढणारे पर्यटन अशा वनसंपदेला बाधा आणणारे ठरणार आहे. यासाठी गड संवर्धनासोबत वन संवर्धनही व्हावे, अशी वनप्रेमींची मागणी आहे. आज या वनस्पती काळाच्या ओघात नष्ट होत असल्याने रायगड परिसर बोडका होऊ लागला असल्याची खंत देखील वाडकर यांनी व्यक्त केली. स्थानिक ग्रामस्थ आणि कांही संस्थांनी पुढे येऊन याबाबत विचार केला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

रायगड संवर्धनामध्ये वनस्पती व पक्षी यांच्याबाबत गांभीर्याने विचार होताना दिसत नाही. अशा वनस्पती व पक्ष्यांची निर्मिती होण्यासाठी शेकडो वर्षांचा कालावधी लागतो त्यासाठी या वनसंपत्तीचे जतन झाले पाहिजे.
-सुरेश वाडकर ( रायगड किल्ल्याचे अभ्यासक)

नीलेश पवार – महाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -