घरमहाराष्ट्रमुंबई पुणे प्रवासातला आडोशी टनेल सुरक्षित होणार

मुंबई पुणे प्रवासातला आडोशी टनेल सुरक्षित होणार

Subscribe

पावसाळ्याआधीच एमएमआरडीसीचे काम

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर सातत्याने गेली १५ वर्षे दरड कोसळण्याच्या प्रकारावर आता कायमचा रामबाण उपाय काढण्यासाठीचा पुढाकार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. आता आडोशी बोगद्यानजीक दरड कोसळण्यावर उपाय म्हणून पुन्हा एकदा काम करण्याची तयारी एमएसआरडीसीकडून करण्यात आली आहे. त्यासाठी दहा कोटी रूपयांची निविदा प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे.

आडोशी टनेलच्या बाहेर ५०० मीटरच्या अंतरादरम्यान हे दरडीचे काम करण्यात येणार आहे. या निविदा प्रक्रियेत होणार्‍या कामामध्ये संपुर्ण दरड कोसळणार्‍या क्षेत्रात सातत्याने निरीक्षण करणे शक्य होणार आहे. मुंबईच्या दिशेने येणारी डावीकडील लेन ही नेहमीच दरडीच्या धोक्याखाली असते. त्यामुळेच ही उपाययोजना एमएसआरडीसीकडून करण्यात येणार आहे. याआधी दहा वर्षांपूर्वी दरडींच्या क्षेत्रासाठी काम करण्यात आले होते. पण गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत अनेक ठिकाणी दरडींना गेलेल्या तडा तसेच पाण्याच्या प्रवाहाचे मार्ग याचा अभ्यास तज्ञांकडून होत असल्याची माहिती आहे. अनेकदा या भेगांमधूनच दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. यावेळी एमएसआरडीसीकडून अवलंबण्यात येणार्‍या पर्यायात दरडींसाठीचे सोल्यूशन काढण्यात यश येईल असा विश्वास एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांना वाटतो.

- Advertisement -

आडोशी टनेलनजीक झालेल्या घटनेच्या अनुभवातून यंदा पावसाळ्याआधीच काम करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे. गेल्या पावसाळ्यात पाण्याचा एक स्त्रोत याठिकाणी वाहून खाली रस्ते वाहतूकीचा खोळंबा करण्यासाठी कारणीभूत ठरला होता. हे वाहते पाणी कसे थांबवता येईल यासाठीचे काम करण्यात येणार आहे. तसेच दरडींचा धोका टाळण्यासाठी ऱॉक बोल्टिंगच्या माध्यमातून या दरडी कोसळू नयेत यासाठीची काळजी घेण्यात येईल. तसेच दरडींमधून छोटे दगड कोसळू नयेत यासाठीही जाळ्या लावण्यात येणार आहेत अशी माहिती अभियांत्रिकी विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. यंदाच्या टनेल नजीकच्या कामामुळे पावसाळ्यात मुंबईच्या दिशेच्या लेनचे ट्राफिक अडवावे लागणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -