घरमहाराष्ट्रकसारा घाटातील प्रवास धोकादायक...

कसारा घाटातील प्रवास धोकादायक…

Subscribe

अपूर्ण कामांमुळे अपघाताची भीती!

नाशिकच्या दिशेकडे जाताना विहीगाव जव्हार फाट्याच्या अलिकडे पावसाळ्यात खचलेल्या रस्त्याच्या कामासाठी कसारा घाटातील रस्ता खोदून ठेवलेला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे घाटात अपघात होण्याची भीती आहे. वाहने चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कसारा घाटातील प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

जुन्या कसारा घाटात रस्त्याच्या डावीकडील दरीची बाजू आठ दहा फूट येथील रस्ता खचलेला आहे. या खचलेल्या रस्त्याच्या डागडुजीचे काम करण्यासाठी मोठमोठे दोन खड्डे रस्त्याच्या लगत संबंधित कंत्राटदाराने खोदून ठेवले आहेत, मात्र ते काम धिम्या गतीने सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हे काम अपूर्ण अवस्थेत आहे. जुन्या कसारा घाटात नाशिककडे जाणार्‍या मार्गावर रोज हजारो कामगार, विद्यार्थी कसार्‍याहून मुंबईकडे ये-जा करत असतात. घाटातील रस्त्याच्या कामासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने तो वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे .

- Advertisement -

परिणामी मोखाडा, खोडाळाकडे जाण्यासाठी प्रवाशांना जुना घाट चढून पुन्हा नवीन घाटातून वळसा घालून अर्धा किमीसाठी जवळपास १० ते १२ किमीचा फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा वाया जात असून, अक्षरशः जीव धोक्यात घालून येथून प्रवास करावा लागत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून जुना कसारा घाट खोदून ठेवला आहे. तरीही या महामार्गावर पडघा व घोटी या टोल नाक्यांवर टोल वसुली जोरात सुरू आहे याकडे कोणत्याही राजकीय पुढार्‍यांचे लक्ष नसल्याने महामार्ग रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची कामे व टोल वसुली करणार्‍या कंपनीची मनमानी वाढली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे .महामार्गावर ठिकठिकाणी अंडरपास ब्रीजची कामे अपूर्ण ठेवणार्‍या व कसारा घाटातील दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून तात्काळ वाहनचालकांची टोल वसुली बंद करावी, अशी मागणी प्रवासी व वाहनचालक करीत आहेत .

अपूर्ण कामांमुळे अपघातात अनेक जायबंदी
मुंबईहून नाशिक आग्रा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्‍या कंत्राटदार कंपनीने रस्त्याचे रुंदीकरण करताना आसनगांव व वासिंद भिवंडी तालुक्यामधील खडवली फाटा व अन्य ठिकाणांवरील अंडरपास ब्रीजची कामे गेली कित्येक वर्षे अपूर्णच ठेवलेली आहेत. बहुतांश ठिकाणी महामार्ग कंत्राटदार कंपनीने अंडरपासची कामे अपूर्ण ठेवल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक वाहनचालक व प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी होऊन त्यांना कायम अपंगत्व देखील आलेले आहे.

- Advertisement -

टोल वसुली सुरुच
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे अपूर्ण कामांकडे लक्ष वेधलेले आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेने टोल नाक्यावर धडक देऊन अंडरपास संदर्भातल्या प्रलंबित मागण्यांबाबत जाब विचारला होता, परंतु ढिम्म महामार्ग प्रशासनाने आजवर थातूरमातूर आश्वासने देऊन आत्तापर्यंत करोडो रुपयांची टोल वसुली सुरुच ठेवली आहे. त्यातही या महामार्गावरील अनेक सर्विस रोड, निवारा केंद्रे, शौचालये यांची दुरावस्था झाली असून टोल वसुली मात्र सक्तीने केली जात असल्याने महामार्ग प्रशासन व टोल कंपनी विरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -