घरमहाराष्ट्रभाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली - उद्धव ठाकरे

भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली – उद्धव ठाकरे

Subscribe

उद्धव ठाकरे यांचा टोला

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांची महायुती जाहीर करण्यात आली आहे. या जागावाटपाच्या वेळी शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांना मिळालेल्या जागांवर सर्वांनी सहमती दर्शवली. यावेळी मित्रपक्षांना १४ जागा देण्यात आल्या. पैकी १२ जागांवर कमळाच्या चिन्हावर मित्रपक्ष जागा लढवणार असल्याने भाजपाने मित्रपक्षांना जागा दाखवली, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मित्र पक्षांसह भाजपलाही चिमटा काढला आहे.

आम्ही आमच्या १२४ जागांवर उमेदवार दिले असून मित्रपक्षांनी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवावी हा त्यांचा प्रश्न आहे. मित्रपक्षांना भाजपने जागा देण्याचे कबूल केले होते त्यामुळे जर ते कमळ चिन्हावर जागा लढवत असतील तर भाजपने त्यांची जागा त्यांना दाखवून दिली, असा टोलाही उद्धव यांनी लगावला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध समाजाच्या नेत्यांसोबत रंगशारदा येथे त्यांच्याशी शनिवारी चर्चा केली.

- Advertisement -

त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्व समाज घटकांची साथ मोलाची आहे. यासाठी सर्व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. समाजातील विविध मागण्यांचा पाठपुरावा करणार आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जे सरकार समाजाला न्याय मिळवून देणार नसेल तर ते सरकार काय कामाचे. आता इतिहास घडणार नाही तर आपण घडवणार असे सांगत यापुढे मागण्यांचा पाठपुरावा तुम्ही करु नका मी करेन असे आश्वासनही उद्धव यांनी दिले.

सक्षम पर्याय नसल्याने भाजपसोबत

महायुतीत सहभागी होताना रिपब्लिकन पक्षाने दहा जागांची मागणी केली होती. मात्र, आम्हाला सहा जागा देण्याचे मान्य केले गेले. प्रत्यक्षात पाचच जागा देण्यात आल्या. मानखुर्द मतदारसंघात सेनेच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला. युतीत जागा कमी मिळाल्याने आम्ही नाराज आहोत. परंतु अलिकडच्या काळात सक्षम पर्याय नसल्यानेच आम्ही महायुतीसोबत असल्याचे सांगत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजप-सेना युतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली. परंतु, आता अन्याय सहन करून पुढे सत्तेत वाटा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

आज नाशिक दौर्‍यात खासदार आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाला अपेक्षित जागा न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. आठवले म्हणाले, भंडारा, पाथरी, नायगाव, फलटण, सोलापूर आणि मानखुर्द या सहा जागा सोडण्यात आल्या. मात्र, मानखुर्दच्या जागेवर शिवसेनेच्या उमेदवारानेही अर्ज दाखल केला. त्यामुळे ही जागा सोडावी याकरिता मी उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रातही आम्हाला जागा मिळाली नाही.

देवळाली, भुसावळ, श्रीरामपूर या जागांचीही मागणी होती. मात्र, तेथेही आमची नाराजी झाली. खरं म्हणजे शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र यावी याकरिता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यानुसार आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. परंतु आता जागावाटपात अन्याय होत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. वंचित बहुजन आघाडीने लोकसभेत जरी दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी विधानसभेत त्यांचा फारसा परिणाम दिसून येणार नाही. परिणामी, सक्षम पर्याय नसल्याने आम्ही भाजपसोबत आहोत असेही ते म्हणाले. असे असले, तरी अन्याय सहन करून सत्तेत अधिकाधिक वाटा देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने आम्ही महायुतीत आहोत.

दआरपीआयचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्हाला संगणक हे चिन्ह मिळत होते. परंतु इतक्या कमी कालावधीत प्रचार करणे शक्य होणार नसल्याने आमचे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. सत्तेसाठी आम्ही कमळ घेतल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार करत असलेले काम, ३७० कलम हटवण्याचा घेण्यात आलेला निर्णय, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने केलेले काम यामुळे यंदा विधानसभेत आम्ही २४० ते २५० जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली नसल्याबाबत विचारले असता त्यांनी खडसे यांच्याबद्दल आदर व्यक्त करत त्यांना राज्यपालपद किंवा आणखी महत्त्वाचे पद देऊन त्यांचा सन्मान राखला जाईल, असे ते म्हणाले.

काय म्हणाले रामदास आठवले

  • शिवसैनिक पूर्वी जय भीम म्हणत नव्हते, आता म्हणतात.
  • आरपीआयला 10 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती.
  • मित्रपक्षाचं चिन्ह असले तरी आम्हाला फायदाच होणार.
  • बंडखोरांना आवाहन आहे की पक्षाचे काम करावे.
  • एकनाथ खडसेंना गव्हर्नरपद नक्कीच मिळेल.
  • सेना-भाजप युती नसती तर पळवापळवी झाली असती.
  • आरेचे जंगल तोडू नये असे आमचेदेखील मत आहे.
  • सेना-भाजपत नेहमी गडबड असते; पण आता नाही.
  • कोणाला निवडायचे, कोणाला पाडायचे हे आम्ही ठरवतो.
  • आंबेडकरांना लोकसभेत चांगली मते, पण आता नाही.
  • कमळावर लढलो तरी, आम्ही आरपीआयवालेच.

फडणवीस मुख्यमंत्री, आदित्य उपमुख्यमंत्री 

राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील असेही आठवले म्हणाले. मात्र, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री होईल. भाजपकडे जास्त जागा असल्याने त्यांचाच मुख्यमंत्री होईल असा पुनरूच्चारही त्यांनी केला. सेना-भाजप भाऊ भाऊ जरी असले तरी, भावांमध्ये अनेकदा गडबड असते. परंतु यंदा तशी गडबड होणार नाही. अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

शिखंडीसारखे वार करु नका, मर्दासारखे समोर येऊन लढा -फडणवीस

’शिखंडीसारखे वार करु नका, मर्दासारखे समोर येऊन लढा’, अशा कडक शब्दांत पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणार्‍या विरोधकांवर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांच्या या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेल्या अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात डिसेंबर २०१८च्या नोटरीचा शिक्का वापरला गेला आहे. त्यामुळे विरोधकांकडून हा अर्ज रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या विषयावर विरोधकांकडून इतका गदारोळ झाला की प्रकरण निवडणूक निर्णय अधिकारी पर्यंत गेले. यावर बंद दरवाज्या आड सुनावणी झाली आणि अखेर या सुनावणीत मुख्यमंत्र्यांच्या बाजूने निर्णय लागला.

नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री

’शिखंडीसारखे वार करु नका, मर्दासारखे समोर येऊन लढा. नोटरीमध्ये चूक असेल तर ती चूक नोटरीची आहे. उमेदवाराची त्यात काहीच चूक नाही. अर्ज योग्यच आहे आणि याशिवाय नोटरी नसली तरी फॉर्म रद्द होत नाही, असे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -