वाहन, गृहकर्ज स्वस्त होणार

रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के कपात

home loan

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे रेपो रेट आता ५.१५ टक्के इतका झाला असून वाहन आणि गृह कर्ज स्वस्त होणार आहेत. आरबीआयने आपली तिमाही धोरण शुक्रवारी जाहीर केले. त्यात रेपो रेटमध्ये कपात केल्याचे जाहीर करण्यात आले. आरबीआयने चलनविषयक धोरण समितीच्या समीक्षा बैठकीत रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपीचा वृद्धिदर पाच टक्क्यांवर आला आहे. हा दर सहा वर्षांतील नीचांक आहे. देशाच्या आर्थिकवृद्धीसाठी आरबीआयने मागील वर्षभरात चार वेळा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. या चार वेळा मिळून 1.10 इतका रेपो रेट कमी करण्यात आलेला आहे.

नऊ वर्षांत पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये एवढी कपात करण्यात आलेली आहे. रिव्हर्स रेपो रेट 0.25 टक्क्यांनी घटवून 4.90 टक्के करण्यात आला असून, बँकेचा रेट 5.40 टक्के झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2019-20 जीडीपीचा अंदाज 6.9 टक्क्यांवरून घटवून 6.1 टक्के केला आहे. तसेच 2020-21मध्ये जीडीपीचा अंदाज 7.2 टक्के व्यक्त केला आहे. रेपो दरात कपात केल्यामुळे गृह कर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होणार असून ग्राहकांना महिन्याला भरावा लागणारा बँकेचा हप्ता कमी होणार आहे.

रेपो रेट म्हणजे काय?
बँकांची मोठ्या रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. परंतु, हे दर वाढले तर बँकांचे कर्जही महाग होते आणि त्याचा फटका ग्राहकांना बसतो.