मराठा आरक्षणासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करणार – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षण हा विषय राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा ठरत आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं तर यासंदर्भात भाजपने आपली भूमिका घोषित केली आहे. यासगळ्यात भाजप झेंडा आणि बॅनर हाती न घेता मराठा आरक्षणासाठी भाजपा सहभागी होतील आणि मराठा आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट झाली नाही, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी मराठा आरक्षणासह ब्राम्हण समाज आणि इतरही आणखी असे समाज जे आरक्षणापासून वंचित असल्याचा उल्लेख आवर्जून केला. ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांविषयी चिंता व्यक्त करत पाटील म्हणाले, अशा समाजांसाठी आम्ही महामंडळ उभारण्याचा प्रयत्न केला होता. पण ते अजूनही सुरुच झालेले नाही. यामध्ये सरकारच्या दुरदृष्टीचा अभाव आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनाही त्यासाठी विनंती करणार असून त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

तसेच, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचार करून वेगवेगळ्या स्वरूपात दहावी, बारावीची परीक्षा झालीच पाहिजे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले, इतकंच नाही तर सध्या ‘हम करे सो कायदा’ असं सरकारचे धोरण आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर देखील हल्लाबोल केला. यासह सध्या भासत असलेल्या कोरोना लसींच्या तुडवड्यासंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, खासगी रुग्णालयात लस उपलब्ध होते पण महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध होत नाही. तसेच खासगी रूग्णालयात कुठे ही एकच दर आकारले जात नाहीत. सप्टेंबर पर्यंत ४५ कोटी लस निर्मिती होईल, असा अंदाज आहे. सध्या शहरातील जो वंचित घटक आहे. अशा व्यक्ती करिता शहरातील आमदार, नगरसेवक यांनी आपल्या भागातील किमान दोन रुग्णालयात हजार लस उपलब्ध करून द्याव्यात, असा आमचा प्रयत्न राहणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.