घरताज्या घडामोडी'मला गोळ्या झाडा'; हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील नराधमाची मागणी

‘मला गोळ्या झाडा’; हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील नराधमाची मागणी

Subscribe

संपूर्ण राज्यालाच नव्हे तर देशाला हादरवणाऱ्या वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जळीतकांडातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याने पोलिसांना “माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय, असं म्हणत मला गोळी झाडून मारा” अशी मागणी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला पीडितेच्या मृत्यूची माहिती नव्हती. पीडितेच्या मृत्यूच्या दुसऱ्या  दिवशी (११ जानेवारी) त्याला याबद्दल माहिती मिळाली. यानंतर तो काही काळ नि:शब्द होऊन कारागृहात उभा राहिला आणि नंतर बॅरेकमध्ये आपल्या पलंगावर बसला. मात्र काही वेळेनंतर त्याच्या चेहऱ्यावर घटनेबाबत कोणतेही दुःख दिसले नाही. मात्र नियमित झडती दरम्यान आरोपीने माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय, असं म्हणत मला गोळी झाडून मारा, अशी मागणी केली.

आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे चार दिवस पोलीस कोठडीत तर चार दिवस वर्धा कारागृहात होता. यानंतर २० फेब्रुवारीपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने आरोपीला दुसरीकडे स्थलांतरित करा, अशी मागणी वर्धा कारागृह प्रशासनाकडून करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणातील पाच साक्षीदारांची ओळख परेड हिंगणघाट येथील नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत कारागृहात पार पडली. यावेळी दोन सरकारी पंच उपस्थित असल्याची सुत्रांनी माहिती दिली. तब्बल एक तास ही ओळख परेडची प्रक्रिया चालली. यानंतर या आरोपीला कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने नागपूर येथील कारागृहात हलवण्यात आलं आहे.

- Advertisement -

पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत पोहचलेल्या आरोपीच्या सुरक्षेचा तणाव जिल्हा प्रशासन, कारागृह प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्यावर दिसून येत होता. त्यामुळेच दिवसाला पाच आणि रात्रीला तीन पोलिसांचा तुरुंगाबाहेर खडा पहारा लावण्यात आला होता. शिवाय कारागृहासमोर तात्पुरती पोलीस चौकी आणि शहरातील पेट्रोलिंग वाढवण्यात आली होती.

दरम्यान हिंगणघाटच्या घटनेनंतर आरोपीचा हैद्राबादसारखा गोळ्या झाडत एन्काउंटर करा अशीही मागणी केली जात आहे. दुसरीकडे मला गोळ्या झाडा अशी मागणी स्वतः आरोपीनेच कारागृहात केली. असं असलं तरी आरोपीची ही मागणी पश्चातापाच्या भावनेतून नाही, तर आपल्या विरोधातील जनभावनेच्या दबावातून आल्याचंही बोललं जात आहे. सर्वच स्तरातून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन आरोपीला शिक्षा कधी मिळणार हे पाहावं लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – हिंगणघाट प्रकरण: पीडितेचा मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा गौरव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -