घरमहाराष्ट्रWater Shortage : राज्यात दोन हजार टँकरद्वारे पाणी पुरवठा, मे महिन्यात संख्या...

Water Shortage : राज्यात दोन हजार टँकरद्वारे पाणी पुरवठा, मे महिन्यात संख्या वाढण्याची शक्यता

Subscribe

राज्यात उन्हाचा पारा वाढल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. त्याचा परिणाम राज्यातील अनेक भागांमधील पाणी पुरवठ्यावर होऊ लागला आहे.

मुंबई : राज्यात उन्हाचा पारा वाढल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. त्याचा परिणाम राज्यातील अनेक भागांमधील पाणी पुरवठ्यावर होऊ लागला आहे. शहरी भागावर पाणी कपातीचे संकट असताना ग्रामीण भागातील सुमारे साडेपाच हजाराहून अधिक वाड्या वस्त्यातील लोकांना टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. त्यासाठी दोन हजाराहून अधिक टँकरची मदत घेतली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत तब्बल 28 पटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (Water shortage in Maharashtra rural area)

सध्या संपूर्ण राज्य उष्णतेच्या झळांमुळे होरपळून निघाले आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच संपूर्ण राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा 33.38 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आलेला नाही. मात्र, ग्रामीण भागातील मतदान पार पडल्यानंतर पाणी प्रश्न उग्र होण्याची शक्यता आहे. आजच्या घडीला राज्यातील एक हजार 666 गावे आणि तीन हजार 999 वाड्यांची तहान दोन हजार 93 टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Vasai Panchayat Building: इमारतीची पुनर्बांधणी रखडली

गेल्यावर्षी 12 एप्रिल रोजी राज्यातल्या फक्त 70 गावांना आणि 204 वाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी फक्त 75 टँकर धावत होते. मात्र, पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे एका वर्षात टँकरची संख्या सुमारे 28 पटीने वाढल्याचे मंत्रालयातील मदत आणि पुनर्वसन विभागाच्या एका अधिकाऱ्याने मान्य केले आहे. त्यामुळे राज्यातील पाणी टंचाईचे सावट तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

जिल्हानिहाय टँकरची संख्या

ठाणे-32, रायगड-19, रत्नागिरी-03, पालघर-30, नाशिक-238, जळगाव-78, नगर-158, पुणे-116, सातारा-160, सांगली-84, सोलापूर-63,छत्रपती संभाजीनगर-443, जालना-343, बीड-199, धाराशीव-66, बुलडाणा-35

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा

मध्य वैतरणा : 10.61%
भातसा : 41.10%
मोडकसागर : 45.31%
तानसा : 50.03%

मुंबईसह महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला असून येत्या काही दिवसांत पाणी टंचाईचे भीषण संकट ओढावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तरी मुंबईत महानगरपालिकेकडून पाणी टंचाईबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु, पाऊस उशीरा पडल्यास मुंबईतही पाणी टंचाई होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -