घरमहाराष्ट्रएकट्या राणा दाम्पत्यसाठी अख्खी शिवसेना रस्त्यावर

एकट्या राणा दाम्पत्यसाठी अख्खी शिवसेना रस्त्यावर

Subscribe

राणा खार निवास्थानी, शिवसैनिक वांद्र्यात ,शिवसैनिकांच्या समजुतीसाठी मुख्यमंत्री मातोश्रीवर,राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी बजावली नोटिस

सध्या राज्यात सुरू असलेला मशिदींवरील भोंगा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालिसा पठणाचा वाद आता वेगळ्याच वळणावर आला आहे. अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करणार अशी भूमिका घेतल्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अमरावती पोलीस आणि शिवसैनिकांकडून अटकाव होण्याची शक्यता लक्षात घेता राणा दाम्पत्य मध्यरात्रीच अमरावती शहर सोडून शुक्रवारी मुंबईत दाखल झाले.

हे समजताच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली. उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल होताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला, तर दुसरीकडे काही शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानाबाहेर जमल्याने दिवसभर राणा विरुद्ध सेना असा ड्रामा रंगला. हनुमान चालिसा वाचण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत शनिवारी मातोश्रीवर जाणारच, असा पवित्रा राणा दाम्पत्याने घेतल्याने हनुमान चालिसावरून राणा आणि शिवसैनिकांमध्ये राडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने खेरवाडी पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरी जाऊन कलम १४९ अन्वये नोटीस बजावली. मातोश्री बंगला हा मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान असून या परिसरात अनेक शासकीय कार्यालये आणि इतर अतिमहत्त्वाची आस्थापने आहेत. तसेच या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. तसेच धरणे, आंदोलने, रॅली, संप, निदर्शने असे कार्यक्रम फक्त आझाद मैदानात करण्याचा आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात आंदोलन अथवा निषेध करू नये. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस खेरवाडी पोलिसांकडून राणा दाम्पत्याला बजावण्यात आली आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर अमरावतीचे शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी राणा दाम्पत्याला अमरावतीमध्येच रोखण्याचा इशारा दिला होता, मात्र सकाळी राणा दाम्पत्य विमानाने मुंबईत पोहोचले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शनिवारी सकाळी हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा पुनरुच्चार केला.

- Advertisement -

मात्र त्यानंतर तातडीने शिवसैनिक मातोश्रीवर जमा झाले. महाराष्ट्रावर आलेल्या संकटाच्या मुक्तीसाठी आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे नाव घेत वारंवार मते मागितली आहेत, पण तेच आता हिंदुत्वाचा विरोध करीत आहेत. राज्यातील सत्ता मिळताच त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांना जागे करण्यासाठी आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार आहोत, असे रवी राणा यांनी सांगितले.

दरम्यान, मातोश्रीबाहेर शिवसैनिकांसोबत पक्षाचे अनेक मोठे नेतेही उपस्थित होते. यावेळी राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी केली जात होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी ४.३० वाजता शिवसैनिकांना सामोरे जाऊन त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही शिवसैनिक मातोश्रीवर ठाण मांडून होते. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता ठाकरे यांनी शिवसैनिकांनी घरी जाण्याची सूचना केली, मात्र तरीही शिवसैनिक घरी जाण्यास तयार नव्हते. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आम्ही तुम्हाला एकटे सोडून जाणार नाहीत, असे शिवसैनिकांनी सांगितले. रात्री उशिरा शिवसैनिकांची भेट घेऊन मुख्यमंत्री ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे गाडीत बसून वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी रवाना झाले.

शिवसैनिक हजर

# मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी सेनेचे खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, युवा सेना अध्यक्ष वरुण सरदेसाई हजर होते.

# राणा दाम्पत्य हूल देऊन रात्रीच मातोश्रीबाहेर येऊ शकतात. त्यामुळे शिवसैनिक येथे जागता पहारा देणार आहेत, असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या सुखशांतीसाठी, संकटांवर मात करण्यासाठी शनिवारी २३ एप्रिलला सकाळी ९ वाजता मातोश्रीसमोर आम्ही दोघेही हनुमान चालीसा वाचण्यासाठी जाणार आहोत. आम्ही इथे गोंधळासाठी, मुंबईकरांना त्रास द्यायला आलेलो नाही. महाराष्ट्रात संकट सुरू आहे, त्यासाठीच मातोश्रीची वारी करणार आहे. मातोश्रीवर जायला विरोध असेल तर त्याला सामना करण्याची तयारी असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले. खार येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आम्ही कायदा सुव्यवस्थेचे पालन करत आहोत. पोलिसांना सहकार्य करत हनुमान चालीसा वाचणार आहोत. तसेच मुंबईकरांना कोणताही त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्या हिंदुत्वाच्या भरवशावर मुख्यमंत्री मत मागतात, त्याच मुख्यमंत्र्यांना आता सत्तेचा लोभ आला आहे. राज्यावर आलेले संकट पाहता आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीवर वाचणार आहोत. त्याचवेळी कार्यकर्त्यांनो मुंबईला येऊ नका असेही आवाहन त्यांनी केला. आपल्याला मुंबईकरांना कोणताही त्रास द्यायचा नाही. मला अनेकदा मुंबईत रोखण्यासाठीचा प्रयत्न केला गेला, पण मुंबईत पायच ठेवला नाही, तर संपूर्ण जिवंत उभा असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी या हनुमान चालीसा पठणाला विरोध केला नसता. खरे शिवसैनिक असतील, तर मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचुया असेही आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -