घरताज्या घडामोडीका केली 'त्या' विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी ?; जाणून घ्या सविस्तर प्रकरण

का केली ‘त्या’ विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी ?; जाणून घ्या सविस्तर प्रकरण

Subscribe

नाशिक : संशोधन प्रकल्प अर्थात पीएच. डी. करणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (टीआरटीआय) फेलोशिप मिळावी, यासाठी मराठवाडा व नांदेड विद्यापीठातील सहा आदिवासी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी केली. त्यातील आकाश ढोले यास मुख्यमंत्र्यांनी थेट व्यासपीठावर बोलवून घेत, या प्रकरणी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ घातला म्हणून मुंबई नाका पोलिसांनी या सहा व्यक्तिंना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार (दि.15) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड येथील आकाश ढोले, गजानन डुकरे, दादा गोसावी (मराठवाडा विद्यापीठ), बालाजी देवरे, रामदास वाघनकर, साईसिंग पाडवी (नांदेड विद्यापीठ) या आदिवासी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेवून घोषणा देण्यास सुरुवात केली. ‘फक्त घोषणाच नको तर प्रत्यक्ष अमंलबजावणी करा, अशी मागणी त्यांनी भर सभागृहात केली. विद्यार्थ्यांनी गोंधळ घालताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांनी एका विद्यार्थ्याला व्यासपीठावर बोलवण्यास सांगितले व त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले.

- Advertisement -

राज्यातील बार्टी, महाज्योती व सारथी या संस्थांप्रमाणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत पीएच. डी.साठी ३५ ते ४० हजार रुपये फेलोशिप मिळावी, अशी मागणी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी ही मागणी करत आहेत; परंतु, त्यांना केवळ आश्वासन दिले जाते. प्रत्यक्ष अमंलबजावणी झालेली नाही. विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. परंतु, प्रत्यक्ष अमंलबजावणी झालेली नाही. या विद्यार्थ्यांना कधी आदिवासी मंत्र्यांकडे जावे लागते तर कधी आदिवासी आयुक्तांकडे पाठवले जाते. प्रत्यक्षात हाती काहीच पडत नसल्याने हे आंदोलन केल्याचे आकाश ढोले यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी या विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -