घरमहाराष्ट्रशरद पवारांची मातोश्रीवर गुप्त बैठक

शरद पवारांची मातोश्रीवर गुप्त बैठक

Subscribe

एकीकडे करोना, लॉकडाऊन, रेड झोन, नियम-अटी या सगळ्या धबडग्यात राज्यातली जनता व्यस्त असताना दुसरीकडे राज्यात लवकरच एक राजकीय भूकंप होण्याच्या तयारीत असल्याची माहिती ‘आपलं महानगर’ला खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. आणि याला कारण ठरलीय राज्याचं सत्तास्थान असलेल्या ठाकरेंच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी झालेली एक गुप्त बैठक! सोमवारी संध्याकाळी महाविकास आघाडी सरकारचे कर्तेधर्ते शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि या तिन्ही पक्षांचे सांधे एकत्र आणणारे संजय राऊत या तिघांमध्येच ही गुप्त बैठक पार पडली. विशेष म्हणजे, अगदी राज्यातल्या सत्तास्थापनेच्या महागोंधळात देखील ज्या शरद पवारांनी मातोश्रीची पायरी चढली नव्हती, ते शरद पवार सोमवारी रात्री मातोश्रीवर या बैठकीला हजर होते. महाविकास आघाडी सरकार स्थापनेतल्या या तीन प्रमुख नेत्यांमध्ये करोनाचे संकट दाराशी उभे असताना नक्की काय खलबतं झाली, यावर आता चर्चा सुरू झालेली असताना महाराष्ट्रात हा राजकीय भूकंप होऊ घातला असल्याची कुणकुण लागली आहे!

गेली ५ दशके महाराष्ट्रात आणि देशात महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या शरद पवारांकडे संपूर्ण राज्याचा कानोसा असतो. करोनाच्या काळात एकूण स्थिती हाताबाहेर जात असल्याचा अनुभव अनेकांनी पवारांकडे कथन केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य चालवणे आणि एक पक्ष चालवणे ही वेगवेगळी बाब आहे हे लक्षात आल्यानंतर सोमवारी संध्याकाळी उशिरा मातोश्रीवर झालेल्या बैठकीत पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर थेट नाराजी व्यक्त केल्याचं खात्रीलायकरित्या कळतं. येत्या गुरुवारी महाविकास आघाडी सरकारला ६ महिने पूर्ण होत असल्यामुळे त्याअगोदरच सरकारवर सत्ता जाण्याचं ढग दाटले आहेत. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी स्वत: पवार मातोश्रीवर बैठकीला गेल्याचे समजते. ज्या पद्धतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे, हे पाहता केंद्रात देखील महाराष्ट्राबाबत पडद्यामागे काहीतरी सुरू आहे, याची कुणकुण पवारांना लागली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारमध्ये अनबन?
करोनाचे रुग्ण मुंबईसह महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहेत. राज्याच्या ५५ हजार रुग्णांच्या तुलनेत मुंबईतले रुग्ण ३२ हजारांहून अधिक तर १०१२ रुग्ण आत्तापर्यंत दगावले आहेत. एकूणच करोना हाताळण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्यामुळे सरकारमधल्या मित्र पक्षांकडून आणि विरोधकांकडून महाविकास आघाडीला दररोज लक्ष्य केले जात आहे. स्वत: शरद पवार हेही मागील आठवड्यात तीन वेळा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संभाव्य स्मारकामध्ये बैठकीला गेले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्रीही सरकारच्या कामाबाबत समाधानी नसल्याचे वारंवार खासगीत आणि जाहीरपणे देखील सांगत आहेत. खुद्द शरद पवार यांनी एका बैठकीत लॉकडाऊन तात्काळ उठवून साखर उद्योग, कृषी उद्योगाला आणि छोट्या उद्योगांना चालना मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपले मत व्यक्त केले होते. मात्र, त्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत तात्काळ लॉकडाऊन उठवला जाणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे दोन्ही पक्षांत सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यातच काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मनात आपण सांगितलेलं कोणतंही काम या सरकारमध्ये होत नाही, करोनाच्या कठीण काळातही आपल्याला डावललं जातं, असा एक सूर आहे. तर शिवसेनेचा गड असलेल्या मुंबई-ठाण्यातच शिवसैनिक, नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकार्‍यांना रुग्णालयात बेड मिळत नसल्यामुळे कमालीची नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी स्वत: एक पाऊल पुढे टाकत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेले मातोश्री गाठले आणि संभाव्य राजकीय अस्थिरता दूर करण्यासाठी आपला ५ दशकांचा अनुभव बैठकीत मांडल्याचे समजते.

‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सोमवारी रात्री गुप्त बैठक झाल्याचे वृत्त ‘आपलं महानगर’ची वेबसाईट ‘मायमहानगर डॉट कॉम’ने सोमवारी रात्रीच सर्वप्रथम दिल्यानंतर खळबळ उडाली. मंगळवारी सकाळपासून या बातमीच्या अनुषंगाने राजकीय खुलासे, स्पष्टीकरण येऊ लागले. विविध वृत्तवाहिन्या, वेबसाईटने या वृत्ताचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अशी भेट झाल्याचेही स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -