घरमुंबईभांडुप येथील धोकादायक शौचालयांच्या पुनर्बांधणीसाठी २० कोटींचा खर्च

भांडुप येथील धोकादायक शौचालयांच्या पुनर्बांधणीसाठी २० कोटींचा खर्च

Subscribe

भांडुप येथे काही कालावधीपूर्वीच धोकादायक शौचालयाच्या ठिकाणी दुर्घटना घडून जीवित हानी झाली होती. मात्र पालिकेने अलिकडेच केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार भांडुपमधील झोपडपट्टी परिसरातील धोकादायक ठरलेली ३० शौचालये पाडून त्या ठिकाणी २० कोटी रुपये खर्चून तळमजला अधिक १ व तळमजला अधिक २ अशा स्वरूपाच्या नवीन शौचालयांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मात्र एका शौचालयाच्या बांधकामासाठी सरासरी ६८ लाख रुपयांचा खर्च हा जास्त वाटत असून त्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत पहारेकरी भाजप व विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून आक्षेप घेतला जाण्याची व त्यावर खरमरीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

मुंबईत २१ वर्षांपूर्वी घाटकोपर (प.) येथे डोंगराळ भागात शौचालयाच्या टाकीचा स्फोट होऊन दरड चाळींवर कोसळल्याने मोठी जीवित हानी झाली होती. मुंबईतील झोपडपट्टी परिसरात अनेक ठिकाणी धोकादायक शौचालये असून नागरिक जीव मुठीत धरून त्याचा आजही वापर करीत आहेत. मात्र अशी धोकादायक स्वरूपातील शौचालये वेळीच दुरुस्त अथवा पुनर्बांधणी न केल्याने कोसळून दुर्घटना घडतात व त्यामुळे जीवित हानी होते.

यास्तव, पालिकेने पूर्व उपनगरातील भांडुप विभागातील झोपडपट्टीत काही कालावधीपूर्वी मुंबई मलनि:सारण विल्हेवाट प्रकल्पाअंतर्गत (एमएसडीपी) उभारण्यात आलेल्या ९४ शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. सदर ९४ पैकी १९ शौचालये ही दोषदायित्व कालावधीतील असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित ७५ शौचालयांपैकी सी-१ वर्गातील ९ शौचालये तातडीने हटविण्यात आली आहेत. तर, सी -२ अ, सी २ बी, सी २ सी वर्गातील ६६ शौचालयांपैकी ४३ शौचालयांच्या दुरुस्तीचा खर्च हा नवीन बांधकामासाठी येणाऱ्या खर्चाच्या ४५% अधिक आहे, असा दावा पालिकेने केला असून त्यांची पुनर्बांधणी आवश्यक आहे. तसेच, २३ शौचालयांच्या दुरुस्तीचा खर्च हा नवीन बांधकामांच्या खर्चाच्या ४५% पेक्षाही कमी असल्याने त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे पालिका प्रशासनाने म्ह्टले आहे.

- Advertisement -

पालिकेने ३० धोकादायक स्थितीतील शौचालयांच्या पुनर्बांधणीच्या कामाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यासाठी पालिका तब्बल २० कोटी ३७ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. सदर कंत्राटदाराने त्या शौचालयांच्या पुनर्बांधणी बरोबरच या शौचालयात मलाने तुंबणार्या व त्यामुळे दुर्गंधी सुटणाऱ्या मलकुंडांच्या सफाईचे कामही करावे लागणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -