घरमुंबईचिमुरडीच्या दुर्धर आजारावर जीटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया

चिमुरडीच्या दुर्धर आजारावर जीटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया

Subscribe

हरलर सिंड्रोम आणि मणक्याच्या दुर्धर आजाराने होती त्रस्त

लातूरमधील एका ३ वर्षांच्या चिमुरडीच्या दुर्धर आजारावर जीटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे, तब्बल दिड वर्षांनी या चिमुरडीचे हातपाय हलू लागले आहेत. ही मुलगी गेल्या दिड वर्षांपासून हरलर सिंड्रोम आणि मणक्याच्या दुर्धर आजाराने त्रस्त होती. तिच्या मानेतून जाणाऱ्या मणक्यावर दबाव पडून हातापायाची हालचाल बंद झाली होती. त्यामुळे, तिला अपंगत्व आलं होतं. दीड वर्ष ती अंथरुणाला खिळून होती. त्यातच पडल्याने तिला इजा देखील झाली होती. पण, कुटुंबांची परिस्थिती बेताची असल्याने या मुलीचे उपचार करणं शक्य होत नव्हतं. पण, उपचार झाले नसते तर लहान वयात असणारी कमी प्रतिकारशक्ती त्यामुळे अनेक इन्फेक्शन आणि बेड सोअर अशा अनेक समस्यांचा तिला सामना करावा लागला असता.

त्यामुळे, तिच्या कुटुंबाने तिला मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलच्या संलग्नित गोकुळदास तेजपाल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. जी.टी. हॉस्पिटलमध्ये तिचं सी.टी. स्कॅन, एम.आर.आय , एक्स-रे आणि इतर चाचण्यांद्वारे तपासणी केली असता तिला ‘हरलर सिंड्रोम आणि अटलांटो अॅक्सिल डिसलोकेशन’ असल्याचं निदान झालं.

- Advertisement -

काय आहे हरलर सिंड्रोम?

हरलर सिंड्रोम हा लाखात एका बाळाला होणारा आनुवंशिक दुर्धर आजार आहे. यात मुख्यत: शरीरातील हाडांवर विपरित परिणाम होतो. या मुलीच्या मणक्यातील पहिल्या आणि दुसऱ्या मणक्यातील सरकण्यामुळे आतील मज्जातंतू बारीक झाले होते आणि तीव्र दबाव येत होता.

- Advertisement -

इतक्या कमी वयात तिच्यावर आव्हानात्मक अशी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. डॉक्टरांनी हे आव्हान पेलण्याचा निर्णय घेत महात्मा ज्योतिबा फुले जीनवदायी योजनेअंतर्गत तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

अशी केली शस्त्रक्रिया 

मुलीच्या मणक्यातील मज्जातंतूवर पडणारा दबाव काढून ढिले झालेले मणके स्क्रू टाकून स्थिर करण्यात आले, ज्यामुळे मणक्याला एक सक्षम आधार मिळाला. त्याचप्रमाणे मुलीसाठी टाटा बोन बँकेतून ग्राफ्टदेखील मागवण्यात आले. टायटॅनियम स्क्रू हा लहान मुलीच्या मणक्यातून आणि एवढ्या अरुंद हाडाच्या जागेतून टाकताना मेंदूला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी आणि मज्जातंतू या दोघांना अपाय होण्याची शक्यता होती.

या शस्त्रक्रियेत जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले आणि जी. टी. हॉस्पिटलचे अस्थिव्यंग प्रमुख डॉ. धीरज सोनावणे यांच्यासह डॉ. बिपुल गर्ग, डॉ. ओंकार शिंदे, भूलतज्ज्ञ आणि नर्सिंग स्टाफ यांनी देखील अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तिच्या हातापायाची गेलेली ताकद परत येऊ लागली आहे. त्यामुळे, मुलीच्या पालकांनी रुग्णालयाचे आणि डॉक्टरांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -