घरमुंबईचंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या; विरोधकांची मागणी

चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या; विरोधकांची मागणी

Subscribe

देवस्थानच्या जागेवर घोटाळा करणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा धिक्कार अशा घोषणा देत विरोधकांनी विधान भवनाच्या पायर्यांवर जोरदार राजीनाम्याची मागणी केली आहे.

पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बिल्डरधार्जिणे निर्णय घेऊन ३४२ कोटींचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. पुण्याच्या हवेली तालुक्यातील एका निर्णयातून राज्य सरकारचे ४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर पुण्यातीलच बालेवाडी येथील दुसर्‍या प्रकरणात महसूल मंत्र्यांच्या आशीर्वादामुळे मैदानाच्या आरक्षित जागेवर ३०० कोटींची इमारत उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी जयंत पाटील यांनी हा मुद्दा अर्थसंकल्पातील अनुदानाच्या चर्चेदरम्यान उपस्थित केला होता. या प्रकरणावरुन चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. विधिमंडळांच्या पायऱ्यांवर उभे राहून विरोधकांनी घोषणा करत चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.

५० टक्के रक्कम नजराणा म्हणून सरकारला द्यावी

देवस्थानची जमीन हस्तांतरित करायची झाल्यास जमिनीच्या विक्रीतून मिळणारी ५० टक्के रक्कम नजराणा म्हणून सरकारला द्यावी लागते. म्हतोबा देवस्थानने ही जमीन राधास्वामी सद्संग व्यास यांना २००८ साली विकली, मात्र ही विक्री करताना शासनाची परवानगी घेतली नसल्याने हा व्यवहार रद्द करण्यात आला. हा व्यवहार नियमित करण्यासाठी राधास्वामी व्यासने विभागीय आयुक्त नितीन करीर यांच्याकडे अर्ज केला. आयुक्तांनी नजराणा भरण्याचा आदेश दिला. त्यानंतर २०१८ साली राधास्वामी व्यासने सदर जमिनीचा अकृषिक (एन.ए.) वापर करण्याची परवानगी जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे मागितली. मात्र ठरलेला नजराणा भरला नसल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी अकृषिक करण्याची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर अर्जदार राधास्वामी सद्संग व्यासने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अपील केले. १० डिसेंबर २०१८ रोजी आपल्या अधिकारात अर्ध न्यायिक निर्णय देताना महसूल मंत्र्यांनी नजराणा माफ केला. ज्यातून राज्य सरकारला एकूण ४२ कोटींचा तोटा झाला, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांनी आरोप फेटाळले

जयंत पाटील यांनी आरोप केलेल्या पहिल्या प्रकरणात देवस्थानला दिलेली जमीन १८८५ च्या ब्रिटिश नोंदीप्रमाणे इनाम वर्ग ३ मध्ये नसल्यामुळेच ती खासगी जमीन असल्याला निर्णय दिला असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. तर दुसर्‍या प्रकरणात बालेवाडी येथील सर्वे क्र. १७ च्या जमिनीची फेरमोजणी करण्याचे आदेश दुसर्‍या अधिकार्‍याला दिले असल्याचे सांगत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले.

जयंत पाटलांच्या पत्रकार परिषदेत महसूलमंत्री बसले   

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा प्रेस रुममध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हेही या पत्रकार परिषदेला येऊन बसले. जयंत पाटील यांची पत्रकार परिषद संपताच त्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

हेही वाचा – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ३४२ कोटींचा घोटाळा

हेही वाचा – युती होण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणाी केले – चंद्राकांत पाटील


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -