घरCORONA UPDATEठाणे: आधीच कोरोना त्यात आयुक्त बंगल्यावर ५० लाख खर्च मत 'करोना'

ठाणे: आधीच कोरोना त्यात आयुक्त बंगल्यावर ५० लाख खर्च मत ‘करोना’

Subscribe

कोरोनाचा प्रकोप सुरु असताना आरोग्यविषयक मुलभूत सोयीसुविधांसाठी ठाणे पालिका संघर्ष करत आहे. मात्र दुसरीकडे आयुक्त बंगल्याच्या दुरुस्तीसाठी ५० लाखांच्या निविदा काढून ठाणेकरांच्या खिशावर कात्री मारण्याचा घाट घातला जात आहे. आधीच्या आयुक्तांच्या कार्यकाळात उत्तम पध्दतीने डागडुजी केलेल्या या बंगल्यावर पुन्हा एकदा ‘सोन्याची कौलं’ चढवण्याचा घाट घातला जात असून हा प्रकार कोरोनाकाळात ठाणेकरांच्या भावनांशी खेळणारा आहे, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणी ‘आधीच कोरोना, त्यात आयुक्त बंगल्यावर खर्च मत ‘करोना’ असे बजावले आहे.

ठाण्याचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पदभार सोडल्यानंतर कोरोनाचा प्रार्दुभाव सुरु असतानाच नवे आयुक्त विजय सिंघल यांनी आयुक्तपदाची धुरा हाती घेतली. काही दिवसात त्यांनी कामाची छाप पाडण्यास सुरवात केलेली असतानाच नव्या आयुक्तांसमोर स्वत:ची काॅलर ताठ करुन घेण्यासाठी पालिकेतील भ्रष्ट प्रशासकीय साखळीने पातलीपाडा येथील आयुक्त बंगल्याच्या नुतनीकरणाचा विडा उचलला आहे. याबाबत पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरण आणि दुरुस्तीचे वेध लागलेले आहेत. कोरोना संकटात पालिकेच्या रुग्णालय आणि क्वारंटाईन सेंटरची दुरावस्था आहे. ठाणे पालिका लोकप्रतिनिधी स्वत:चे एक महिन्याचे वेतन आणि नगरसेवक निधी या आपत्ती निवारणासाठी देत आहेत. पालिका कर्मचार्‍यांच्या वेतनात कपात केली जात आहे. अशा कसोटीच्या काळात प्रशासनातील सर्वोच्च पदावरील अधिकार्‍याच्या बंगल्यावर वारेमाप खर्च करणे निश्चितच सद्यपरिस्थितीत योग्य नसल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

निविदा प्रक्रियेतदेखील गडबड गोंधळ

सर्वसाधारणपणे निविदा भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जातो. अत्यावश्यक कामादरम्यान हा कालावधी सात दिवसांचा असतो. त्याच धर्तीवर या कामासाठी अवघ्या सात दिवसात निविदा मागवल्या असून आयुक्त बंगल्याची डागडुजी करण्यापुर्वी त्याचे स्ट्रक्चर ऑडिट झाले आहे का? कोरोना उपचारांसाठी आवश्यक असलेल्या साहित्य खरेदीला काटेकोर नियम लावले जातात. मग बंगल्याच्या दुरूस्तीला सवलत का? असे सवालही संदीप पाचंगे यांनी उपस्थित केले आहेत.

अबब… ५० लाखांचे वाॅटर प्रूफिंग

तब्बल ४९ लाख ८३ हजारांच्या या कामात बंगल्याचे वाॅटर प्रूफिंग, प्लॅबिंग केले जाणार आहे. मात्र याआधीचे आयुक्त जयस्वाल यांच्या काळातही आयुक्त बंगल्यावर लाखोंची उधळण केली जात होती. ती नेमकी कुठे मुरली? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. आयुक्तांनीच या खर्चाला कात्री लावून आवश्यक कामे करुन घेण्याची मागणी संदीप पाचंगे यांनी केली आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -