घरमुंबईबोगस शाळांवर कारवाई करा

बोगस शाळांवर कारवाई करा

Subscribe

लोकायुक्तांचे ठाणे महापालिकेला निर्देश

ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा मुंब्रा, दिवा तसेच राबोडी परिसरातील मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या अनधिकृत शाळांवर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मागील अनेक वर्षापासून या शाळा बिनदिक्क सुरु होत्या. मात्र आता लोकायुक्तांनीच या शाळा कायमच्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत या शाळा बंद झाल्या नाहीत तर प्रत्येक शाळेला सुमारे 10 लाखांचा दंड आकारण्यात येणार असून प्रत्येक दिवसाला 10 हजार रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत. असे स्पष्ट निर्देश लोकायुक्तांनी दिले आहेत.

ठाणे महानगर पालिका क्षेत्रात असलेल्या अनधिकृत शाळांची यादी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून प्रत्येक वर्षी जाहीर करण्यात येते. यावर्षी देखील ही यादी मागील जून महिन्यात जाहीर करण्यात आली होती. ज्यामध्ये वागळे इस्टेट, राबोडी, कळवा मुंब्रा आणि दिवा या भागातील इंग्रजी माध्यमांच्या 51 शाळा मराठी माध्यमाच्या तसेच हिन्दी माध्यमाच्या दहा शाळा आहेत. या शाळांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे बेकायदा शाळांना कुणाचे अभय मिळते ? असा प्रश्न निर्माण झाला होता.

- Advertisement -

या शाळांवर कारवाईच्या लेखी तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या. काही शाळांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यातही तक्रारी दाखल आहेत. या सर्व शाळांचे संचालक, सचिव, मुख्याध्यापक आणि शिक्षण मंडळ यांच्या संगनमताने परवानगी नसताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. यामध्ये विद्यार्थी, पालक यांच्यासह शासनाची फसवणूक होत आहे. याची लेखी तक्रार मुंब्रा प्रभागातील समाजसेवक जावेद अख्तर यांनी थेट लोकायुक्तांकडे केली. लोकायुक्तांनी या शाळांची महिती पालिकेकडून पुन्हा एकदा मागवली आणि त्यावर थेट कारवाईचे आदेश दिले आहेत. त्या कारवाईचा अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत लोकायुक्त कार्यालयाला सादर करावा. अन्यथा लोकायुक्त स्तरावर या प्रकरणी कारवाई करण्यात येईल. असेही ठामपाला दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यावर ठामपा शिक्षण विभागाचे धाबे दणाणले असून या शाळा तातडीने बंद करण्याच्या नोटीसा ठामपा शिक्षण विभागाने सदर संस्थांचालकांना दिल्या आहेत.

लोकायुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार ठामपा शिक्षण विभागाने कारवाई सुरु केली आहे. या शाळांना तात्काळ नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. पुढील काळात आणखीन दोन नोटीस पाठवून अंतिम कारवाईची सूचना करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षाअगोदरच या शाळा बंद करण्यात येतील. या शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या सुमारे 10 हजार 263 विद्यार्थ्यांना ठामपाच्या शाळांमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. जेणेकरून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.
विकास रेपाळे, सभापती, ठाणे महानगर पालिका शिक्षण समिती

- Advertisement -

अधिकृत असलेल्या शाळांमधून या मुलांना प्रवेश मिळत नाही. मात्र त्यांच्यासारख्या दिसणार्‍या उंच इमारती असलेल्या नियमबाह्य शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखल केले जाते. या शाळांची अधिकृत अशी नियमानुसार नोंद नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे नुकसान होते. मागील तीन वर्षापासून मी या विषयावर शासनदरबारी पाठपुरावा करत आहे. मात्र त्याची कोणत्याही स्तरावर दखल घेण्यात आली नाही. अखेर मी मागच्या वर्षी लोकायुक्तांकडे या संबंधी तक्रार दाखल केली. आणि लोकायुक्तांनी तात्काळ या शाळा बंद करण्याचे आदेश ठामपा शिक्षण विभागाला दिले आहेत.
– जावेद अख्तर खान, समाजसेवक मुंब्रा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -