घरमुंबईआता महापालिकेच्या शाळांची दिसणार जाहिरात

आता महापालिकेच्या शाळांची दिसणार जाहिरात

Subscribe

महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच विविध सुविधा मिळत असतानाही पालकांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे पालकांना आकर्षित करण्यासाठी अखेर महापालिकेने त्यांच्या शाळांची जाहिरात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीकोनातून महापालिकाकडून शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे ई लर्निंग, कम्प्युटर एज्युकेशन, डिजिटल टिचिंग, अ‍ॅक्टिव्हिटी बेस शिक्षण, माध्यान्य भोजन, 27 विविध शैक्षणिक साहित्य अशा विविध सुविधांची जाहिरात महापालिकेकडून करण्यात येत आहे. ‘शिक्षक तुमच्या दारी, त्यांना प्रतिसाद द्या’ या टॅगलाईन खाली महापालिकाकडून करण्यात आलेली जाहिरात सध्या यूट्यूबवर प्रसारित करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांकडे पालकांनी पाठ फिरवल्याने अनेक शाळा ओस पडल्या आहेत. त्यातच आता आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठीही पालकांचा पालिकेच्या शाळेकडे दुर्लक्ष केले जाते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या शाळेत पुरवण्यात येणार्‍या सुविधांची माहिती पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी पालिकेच्या डी.एन.नगर सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेने पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या शाळेत देण्यात येणार्‍या सुविधा तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षणाचा दर्जा याची माहिती देणारा व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये ‘सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे, रोशनी जो मिले स्कूल की, जगमगाओ तुम बनके तारे’ या गाण्यावर पालकांना व त्यांच्या पाल्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या गाण्याबरोबरच शाळेमधील मोफत शिक्षण, आनंददायी शिक्षण, ई लर्निंग, अक्टिव्हीटी बेस लर्निंग, कम्प्युटर एज्युकेशन, डिजिटल टिचिंग, फ्री मेडिकल चेकअप, भोजन, विविध 27 वस्तू, सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचबरोबर खेळ अशा खासगी शाळांमध्ये मिळणार्‍या सुविधांपेक्षा अधिक सुविधा पालिकेच्या शाळेत मिळत असल्याचे या व्हिडिओमधून दाखवण्यात आले आहे. इतकेच नव्हेतर या व्हिडीओमध्ये शाळा व घरामधील अंतर संपले असून, आता घरापासून जवळ शाळा आली आहे. शाळेत येण्यासाठी कोणताही प्रवास करण्याची गरज नाही.

- Advertisement -

शाळा अधिक सुरक्षित झाली आहे. शाळेतील शिक्षणाची पद्धत आता पूर्वीसारखी नसून त्यामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. शाळेमध्ये शिक्षकांकडून साहित्य व विविध वस्तूंच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येणार आहे. ज्यामध्ये शिकवण्यापेक्षा प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात आला आहे. शाळेतील शिक्षणाची पद्धत बदलण्याबरोबरच शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक प्रेमाचे करण्याकडे शाळेकडून भर देण्यात येत आहे. शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात येणार नाही. ते तुम्हाला प्रेमाने शिकवणार आहेत, असे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर अन्य खासगी शाळांमध्ये ज्याप्रमाणे पालकांच्या बैठका, स्कूल मॅनेजमेंट कमिटी, आरोग्यदायी वातावरण, उत्तम दर्जाचे शिक्षण पालिकेच्या शाळांमध्ये मिळणार असल्याचे या व्हिडीओमध्यो दाखवण्यात आले आहे.

महापालिकेच्या अंधेरी पूर्वेकडील डी.एन. नगर सेमी इंग्रजी शाळेने केलेल्या या प्रयोगाचा चांगला सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिकेतील उत्तम दर्जाचे शिक्षण व तेथे मिळणार्‍या सोईसुविधांची पालकांना माहिती होण्याची शक्यता शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -